कलेतून निर्माण होणारा आशावादच निराशेवरील मात्रा डाॅ. सदानंद मोरे
पुणेः – कोरोना काळामुळे नागरिकांच्या मनात प्रचंड टोकाचा निराशावाद रूजला आहे. या वातावरणात कलेमुळेच मनुष्याला आयुष्याला सकारात्मकता प्राप्त झाली. कला ही निराशेवरील एकमेव मात्रा आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
रंगत-संगत प्रतिष्ठान तर्फे जागतिक कला आणि सांस्कृतिक दिनानिमित्त कला क्षेत्रात भरीव योगदान देणारे पुण्याच्या कलाक्षेत्रातील प्रसिद्ध साहित्यिक तसेच नाट्यचित्रपट लेखक-दिग्दर्शक श्रीनिवास भणगे,प्रसिद्ध गायक आणि संगीतकार दयानंद घोटकर आणि ख्यातनाम हास्यकवी व विनोदी एकपात्री कलाकार बंडा जोशी या तीन मान्यवरांचा प्रातिनिधिक स्वरुपात डॉ.सदानंद मोरे यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर या कलाकरांसह रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड.प्रमोद आडकर आणि मैथिली आडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, प्रत्येकाच्या जीवनात सुखदुःखांचे चढउतार असतात. शिवाय गेल्या दोन वर्षात तर कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जगाला वेठीस धरले होते. शरीर आणि मन असे मानवी जीवनाताली दोन्ही महत्त्वपूर्ण घटक या काळाने पोखरले. या भीषण वास्तव परिस्थितीत विविध कलांनी आपल्या मनाला उभारी दिली. कारण कला ही मानवी भावभावनांचे स्पंदन टिपत असते.
या गौरव समारंभानंतर सत्कारार्थी कलाकरांनी त्यांच्या कलेचे काही नमुने सादर केले. त्यात दयानंद घोटकर यांनी ओंकार स्वरुपा या गाण्याने सुरवात केली. त्यानंतर ‘जिवाशिवाची जोडी’, ‘मनाच्या धुंदीत’ आणि ‘कानडा राजा पंढरीचा’ या भजनाने सांगता केली. श्रीनिवास भणगे यांनी विनोदावर भाष्य करीत कलावंताच्या जीवनातील काही विनोदी किस्से सांगितले. शेवटी बंडा जोशी यांनी मोबाईलचे किस्से सांगत ‘येड लागलं रे’ हे माोबाईल गीत सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. प्रमोद आडकर यांनी केले. मैथिली आडकर यांनी आभार मानले.
