मनसैनिक राज ठाकरेंवर नाराज, ३५ मुस्लीम कार्यकर्त्यांचा राजीनामा
मुंबई : राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंगे काढण्यास सांगितले होते. त्यानंतर झालेल्या उत्तरसभेत देखील त्यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी 3 मे पर्यंत अल्टीमेटम दिला. त्यामुळे मनसेचे मुस्लीम कार्यकर्ते राज ठाकरेंवर नाराज आहेत. मुंबईसह मराठवाड्यातील ३५ मनसैनिकांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
राज ठाकरेंची मुंबईमध्ये गुढीपाडव्यानिमित्त सभा झाली होती. यावेळी राज यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यास सांगितले होते. तुम्ही भोंगे काढले नाहीतर आम्ही भोंग्यावरून हनुमान चालिसा वाजवू असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत अनेक ठिकाणी भोंग्यावर हनुमान चालिसा लावली. तेव्हापासूनच मनसेमध्ये नाराजी नाट्य सुरू होतं. राज ठाकरेंच्या या भूमिकेला काही मनसैनिकांनी विरोध दर्शवला होता. पुण्यातील वसंत मोरे यांनी देखील विरोध दर्शवला. त्यानंतर त्यांना पदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या उत्तरसभेत राज ठाकरेंनी पुन्हा भोंगे उतरविण्यासाठी अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे आता मनसैनिक नाराज झालेले पाहायला मिळत आहे.
राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर
हनुमान जयंतीनिमित्त पुण्यातील शनिवारी कुमठेकर रोडवरील खालकर मारुती मंदिर येथे सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास राज ठाकरे उपस्थित राहणार आहे. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येण्याच्या आधीच मनसेच्या मुंबई व विविध भागातील कार्यकर्त्यांनी होती राजीनामे दिले आहेत. त्यामुळे उद्या राजकीय वातावरण तापणार हे नक्कीच.
