पुण्यात १४ ते १६ एप्रिलदरम्यान रंगणार सिंधू महोत्सव

पुणे : ‘सांख्य डान्स कंपनी’ आणि ‘मुद्रा सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ते १६ एप्रिल दरम्यान ‘सिंधू महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. नृत्य महोत्सवाचे यंदाचे दहावे वर्ष असून यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड आणि टिळ स्मारक सभागृह, टिळकरोड येथे तीन दिवस कार्यक्रम रंगणार आहे. भरतनाट्यम आणि कथक नृत्यातील दिग्गज कलाकार या महोत्सवादरम्यान वेगवेगळ्या थीमवर आधारित सादरीकरण करतील.

‘सांख्य डान्स कंपनी’चे वैभव आरेकर आणि त्यांचे सहदिग्दर्शक सुशांत जाधव यांच्यासह पुण्यातील मुद्रा नृत्यालयच्या संस्थापिका पूनम गोखले यांच्या पुढाकाराने गेल्या दहा वर्षांपासून हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्य व नाटिका सादर केल्या जातात. आजपर्यंत देशभरातील नामवंत आणि दिग्गज कलाकारांनी या महोत्सवात आपली कला सादर केली आहे.

पुण्यात महोत्सवाच्या पहिल्या दिवशी १४ एप्रिल रोजी नृत्यांगना दिव्या देवगुप्तनू आणि रंजनी रामकृष्णन संहिता सादर करणार असून त्यानंतर धीरेंद्र तिवारी हे कथक नृत्य सादर करतील. त्यानंतर सांख्य डान्स कंपनीची निर्मिती असलेल्या ‘सीझन्स’ या कार्यक्रमाने पहिल्या दिवसाची सांगता होईल. या कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्यातून ऋतूवर्णन करण्यात येईल. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे होणार आहे.

१५ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भरतनाट्यम नृत्यांगना मालविका सरुकाई या भरतनाट्यम नृत्य सादर करणार आहेत. मालविका त्यांच्या अद्वितीय रचना आणि सर्जनशील कथांसाठी प्रसिद्ध आहेत. यानंतर सांख्य डान्स कंपनीची निर्मिती असलेला ‘श्रीमंत योगी’ हा कार्यक्रम सादर होईल. या कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट उलगडला जाईल. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे हा कार्यक्रम होईल.

१६ एप्रिल रोजी जागतिक किर्तीच्या भरतनाट्यम नृत्यांगना रमा वैद्यनाथन यांचे सादरीकरण होणार आहे. त्यानंतर सांख्य डान्स कंपनीची निर्मिती असलेला ‘शिव’ हा कार्यक्रम सादर होईल. टिळकरोडवरील टिळक स्मारक येथे हा कार्यक्रम होणार असून येथेच महोत्सवाची सांगता होईल.

Leave a Reply

%d bloggers like this: