Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

रसिकांना अनुभवला शास्त्रीय गायनाचा परमोच्च ‘आनंद’ 

पुणे : आरंभी वंदीन अयोध्येचा राजा… वद जाउ कुणाला शरण… मै तो हारी रे… झनक झनक बाजे रे बिछुआ…माझे माहेर पंढरी.. मिले सुर मेरा तुम्हारा अशी अजरामर गीते सादर करीत पं. आनंद भीमसेन जोशी आणि पं. आनंद भाटे यांनी रसिक श्रोत्यांना आपल्या गायकीतून परमोच्च आनंद दिला.
श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग येथील राम मंदिरात पं. आनंद भिमसेन जोशी आणि पं. आनंद भाटे यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले, उद्धव तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. तसेच उत्सवात  चैत्राली अभ्यंकर व सहकारी यांच्या गायनाचा तसेच हिमांशु बक्षी यांच्या बासरीवादनाचा कार्यक्रम झाला.

पं. आनंद भीमसेन जोशी यांच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला राग दरबारी कानडा मध्ये ‘झनक झनक बाजे रे बिछुआ’ ही रचना त्यांनी सादर केली. त्यानंतर त्यांनी राग कलावतीमध्ये समर्थ रामदासांची रचना आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आणि पं. भिमसेन जोशी यांनी आपल्या आवाजात अजरामर केलेले ‘माझे माहेर पंढरी’ हे अभंग सादर केले. ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’ आणि मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा या गीतांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

तसेच, पंडित आनंद भाटे यांनी सुरुवातीला दोन बंदिशी सादर केल्या. त्यानंतर संगीत सौभद्र नाटकातील वद जाउं कुणाला शरण हे नाट्य गीत सादर केले. संगीत तुलसीदास नाटकातील मन हो राम रंगी रंगले,आत्मरंगी रंगले ही रचना सादर करून त्यांनी रसिकांची मने जिंकली.संत तुकारामांची रचना याजसाठीं केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा रचनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading