सरकार गेल्यानं भाजपचा थयथयाट, सत्तेसाठी देशात हिटलरशाही; नाना पटोलेंचा हल्लाबोल

कोल्हापूर : महाराष्ट्रात पहाटेचं सरकार गेल्यामुळे भाजपचा थयथयाट सुरु आहे. केंद्रातील सरकारच्या मदतीनं राज्यातील नेत्यांना त्रास देण्याचं काम सुरु आहे. सत्तेसाठी देशात हिटलरशाही सुरु आहे, असा जोरदार हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केला. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राज्यातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली असून सत्ताधारी आणि विरोधकांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. नाना पटोले भाजपवर हल्लाबोल करताना म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये जे अंधारात सरकार झालं होतं, असं सरकार कधीच झालं नव्हतं आणि दीड दिवसाचे गणपती असताता तसं विसर्जनही झालं. यानंतर जो थयथयाट सुरु झाला आहे. तुम्ही राजकीय द्वेषापोटी महाराष्ट्राची बदनामी करताय. तुम्ही कुठल्या पातळीवर चाललात. तुमची पातळी किती खालावत चालली आहे? असे सवाल पटोले यांनी केले आहेत. 

नाना पटोले यांनी वीज प्रश्नावर देखील भाष्य केलं. केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे देशावर वीजेचं संकट आलं आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर इतर राज्यांमध्येही विजेचं संकट निर्माण झालं आहे. मोठ्या प्रमाणात लोडशेडिंग होत आहे. कोळशाचा अभाव आणि सरकारची राजनीती त्यामध्ये आडवी येत आहे. त्यामुळे पूर्ण देशच पुढच्या काळात अंधारात जाईल काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असं नाना पटोले म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: