Friday, June 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

फडणवीस यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न जरी केला तरी योग्य धडा शिकवू – जगदीश मुळीक

पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी तर्फे काल व आज राज्यभर जोरदार निदर्शने करण्यात आली. पुण्यातही काल राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली निदर्शन करण्यात आले. यावेळी जगताप यांनी फडणीसवर यांच्यावर या घटनेमागे त्यांचा हात असल्याचा आरोप केला. यावर आज भाजप पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आरोप सिद्ध करा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा, असे जाहीर आव्हान मुळीक यांनी प्रशांत जगताप यांना दिले आहे. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फडणवीस यांच्या जवळ जायचा प्रयत्न जरी केला तरी त्यांना योग्य तो धडा भाजपा कार्यकर्ते शिकवतील, असा इशाराही जगदीश मुळीक यांनी दिला आहे. 

मुळीक म्हणाले, काल शरद पवार यांच्या मुंबईतील घरासमोर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा मी स्वतः जाहीर निषेध करतो. अशा प्रकारचे आंदोलन हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे आहे. आजपर्यंत भाजपाने कोणत्याही नेत्याच्या घरासमोर अश्या प्रकारे आंदोलन करण्याला पाठिंबा दिला नाही. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आंदोलन करताना त्यांचा तोल पूर्ण ढासळला आणि त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत खोटे आरोप केले. मी त्यांना जाहीर आव्हान देऊ इच्छितो की त्यांनी केलेला आरोप ताबडतोब सिद्ध करावा अन्यथा कायदेशीर कारवाईस सामोरे जावे.

मागील सहा महिने चालू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात कोणताही तोडगा काढू शकले नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते हतबल झाले आहेत आणि विरोधी पक्षांवर ते बेछूट आरोप करत आहेत. एसटी बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे होणारे हाल त्यांना दिसत नाहीत परंतु आपल्या पक्षाचे अपयश झाकण्यासाठी बेताल वक्तव्य करणं एवढेच काम त्यांचे चालू आहे.

ते पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि भाजपाच्या इतर नेत्यांच्या बद्दल काल त्यांनी अत्यंत निषेधार्ह वक्तव्य केले आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. याबद्दल आम्ही केवळ बघ्याची भूमिका घेणार नाही. त्यांनी अथवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फडणवीस यांच्या जवळ जायचा प्रयत्न जरी केला तरी त्यांना योग्य तो धडा भाजपा कार्यकर्ते शिकवतील इशारा भाजप पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading