डिजिटलायझेशनमुळे चित्रपट निर्मिती माध्यमाचे लोकशाहीकरण – सुनील सुखटणकर
पुणे : ” पुर्वी चार मिनिटांचा चित्रपट बनविण्यासाठी तेरा हजार रुपये खर्च करून रीळ आणावी लागायची. चित्रपट निर्मितीची प्रक्रिया अतिशय खर्चिक होती. तसेच तो बनविताना काही बंधने असायची. मात्र अलीकडील काळात डिजिटलायझेशनमुळे चित्रपट निर्मिती माध्यमाचे लोकशाहीकरण झाले असून, ही अतिशय आनंदाची बाब आहे,”असे मत राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते सुनील सुखटणकर यांनी व्यक्त केले.
पी.एम.शाह फाउंडेशनच्यावतीने आयोजित १० व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचा सांगता समारंभ ९ एप्रिल रोजी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कॉलेज रस्ता येथे संपन्न झाला. याप्रसंगी सुखटणकर यांच्या हस्ते महोत्सवातील विजेत्या चित्रपटांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अॅड.चेतन गांधी उपास्थित होते. महोत्सवात माहितीपट या विभागात दिनेश वसंतराव आखाडे दिग्दर्शित ‘रिबर्थ’ माहितीपटाला प्रथम पुरस्कार, ‘फॉर हर’ या डॉ. शेखर कुमार कुलकर्णी दिग्दर्शित माहितीपटाला द्वितीय पुरस्कार तर प्रदीप कुमार अग्निहोत्री दिग्दर्शित ‘ऑटिझम – मुव्हिंग अहेड’ या माहितीपटाला तृतीय पुरस्कार मिळाला. तर लघुपट विभागात गणेश मोडक दिग्दर्शित ‘आरसा – द स्टेटस’ या लघुपटास प्रथम पुरस्कार, सुमीत पाटील दिग्दर्शित ‘लाल’ लघुपटास द्वितीय पुरस्कार मिळाला तर सोनल राठोड दिग्दर्शित ‘ब्रा’ लघुपटाने तृतीय पुरस्कार मिळाला.
यावेळी बोलताना सुखटणकर म्हणाले, ” डिजिटलायझेशनमुळे चित्रपट निर्मिती ही केवळ काही श्रीमंत लोकांपुरती मर्यादित राहिलेली नाही तर गावागावात ते पोहचले आहे. मात्र लघुपट किंवा माहितीपट हे व्यावसायिक चित्रपट निर्मितीसाठी ‘पहिले पाऊल’ नाही, तर तो एक स्वतंत्र विषय आहे. हे ही तरुण निर्मात्यांनी लक्षात घेतले पाहिजे. “
अनेकदा लघुपट, माहितीपट कलाकारांना मुख्य प्रवाहातील कलाकारांप्रमाणे वागणूक मिळत नाही. त्यांना दुय्यम वागणूक मिळते. पण चित्रपट या माध्यमातून काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास घेतलेल्या तरूणाईने स्वतःला दुय्यम न समजता आपले काम करत राहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी अॅड.चेतन गांधी म्हणाले,” तरूण चित्रपट निर्माते आरोग्य या विषयाबाबत काय विचार करतात? या विषयाबाबत त्यांना काय सांगायचे आहे, हे जाणून घेण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चित्रपटाच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी फाउंडेशनतर्फे गेली दहा वर्षे हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. महोत्सवात सहभागी सर्व चित्रपट कौतुकास पात्र आहेत.”
स्वच्छता आणि आरोग्यविषयक जनजागृतीसाठी पी एम शहा फाउंडेशन आणि फ्लेअर नेटवर्क सिस्टम्सतर्फे शहरातील विविध शाळांमध्ये उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिका प्राथमिक शाळा, काळेवाडी (मुले), पिंपरी चिंचवड महापालिका कन्या शाळा, काळेवाडी, यशवंतराव चव्हाण प्राथमिक मुलांची शाळा, थेरगाव, यशवंतराव चव्हाण प्राथमिक कन्या शाळा थेरगाव, लिटल फ्लॉवर्स इंग्लिश मीडियम स्कूल,हडपसर आणि डॉ. दादा गुजर शाळा, हडपसर या सहा शाळांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका जोशी यांनी केले.
