‘तो चांद राती’त खुलणार अमृता – आदिनाथची प्रेमकहाणी

‘चंद्रमुखी’ या चित्रपटाची मागील अनेक महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. पहिल्याच पोस्टरमध्ये पडद्यामागे लपलेला ‘तो’ चेहरा कोणाचा? टिझरमध्ये पिळदार शरीरयष्टी असणारा ‘तो’ ध्येयधुरंदर राजकारणी कोण? असे अनेक प्रश्न या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनात येत होते आणि हळूहळू या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळू लागली. ‘तो’ ध्येयधुरंदर राजकारणी दौलतराव देशमाने म्हणजेच आदिनाथ कोठारे असल्याचे काही दिवसांपूर्वीच समोर आले. त्यानंतर मोठ्या दिमाखदार सोहळ्यात ‘चंद्रमुखी’ ऊर्फ चंद्रा आपल्या भेटीला आली. याच दरम्यान चित्रपटातील ‘चंद्रा’ या बहारदार लावणीनेही श्रोत्यांना वेड लावले. आता या चित्रपटातील चंद्रा आणि दौलतराव यांच्यावर चित्रित करण्यात आलेले एक प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘तो चांद राती’ असे बोल असलेल्या या गाण्याला गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध केले आहे. तर अजय अतुल यांचे सुरेल संगीत लाभलेल्या या गाण्याला आपल्या सुमधुर आवाजाने श्रेया घोषाल हिने चारचाँद लावले आहेत.

या गाण्यात रात्रीच्या मंद प्रकाशात, नीरव शांततेत, चांदण्यांच्या साक्षीने शिकाऱ्यात बसलेल्या दौलतराव आणि चंद्रा यांची हळुवार खुलत जाणारी प्रेमकहाणी दिसत आहे. त्यात या गाण्याला गुरु ठाकूर यांचे थेट हृदयाला भिडणारे बोल आणि अजय -अतुल यांचे सुरेल संगीत लाभल्याने या गाण्याची रंगत अधिकच वाढत आहे. तर हे गाणे अधिक खुलले आहे ते आजुबाजुच्या मोहमयी वातावरणाने. रात्रीचे असे सौंदर्य क्वचितच कोणत्या मराठी चित्रपटात दिसले असेल. या सगळ्याचे श्रेय जाते छायाचित्रणकार संजय मेमाणे यांना.

या गाण्याबद्दल संगीतकार अजय -अतुल म्हणतात, ”बऱ्याच काळाने आम्ही मराठीत पुनरागमन करत आहोत आणि तेसुद्धा ‘चंद्रमुखी’ सारख्या चित्रपटातून. यापूर्वी एक लावणी आपल्या भेटीला आल्यानंतर आता हे प्रेमगीत आपल्या समोर आले आहे. ज्यावेळी आम्हाला कळले की, ‘चंद्रमुखी’ सारख्या चित्रपटाला संगीत द्यायचे आहे. तेव्हा चित्रपटाची भव्यता पाहून त्याला संगीतही तसेच साजेसे हवे, त्यानुसार मग आम्ही संगीताचा विचार केला. खरंतर आमच्यासाठी प्रत्येक गाणे हे पहिलेच गाणे असते. त्यामुळे प्रत्येक गाण्यावर आम्ही तितक्याच तन्मयतेने, निष्ठेने काम करतो. प्रत्येक गाण्यात जीव ओतण्याचा आमचा प्रयत्न असतो. लावणी, प्रेमगीत आल्यानंतर आता आणखी इतर गाणीही हळूहळू आपल्या भेटीला येतील. ‘चंद्रमुखी’च्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदाच ‘प्लॅनेट मराठी’सोबत काम करत आहोत. अक्षय बर्दापूरकर आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांचेही आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभले.” तर गीतकार गुरू ठाकूर म्हणतात, ‘’ या चित्रपटाचे कथानक जितके ताकदीचे आहे, त्याच क्षमतेचे गाण्यांचे बोल आवश्यक होते. प्रेमगीत, लावणी असे गाण्यांचे विविध प्रकार असलेल्या या प्रत्येक गाण्याचे बोल भावपूर्ण आहेत. कथेच्या मूळ गाभ्याला कुठेही धक्का लागणार नाही, याची पुरेपूर काळजी गाणी लिहीताना घेण्यात आली आहे. प्रत्येक गाणे कथा पुढे घेऊन जाणारे आहे.’’

अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले असून पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ कादंबरीवर आधारित हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: