नाराज मनसैनिकांना ‘राज’भेटीचे निमंत्रण मात्र वसंत मोरेंना वगळले

पुणे: मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू असा इशारा मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात दिला होता. त्यानंतर पुणे शहराध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे यांनी त्यावर ठाकरे यांच्या भाषणामुळे आपण बेचैन असल्याचे मत व्यक्त केले. प्रभागातील काही मुस्लीम मतदारांनी ते भयग्रस्त झाले असल्याचेही आपणाला सांगितले. एका शाखाप्रमुखाने राजीनामा दिला, असेही वसंत मोरे यांनी जाहीर केले.

राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे पुण्यातील एका मुस्लिम पदाधिकाऱ्याने देखील पक्षाचा राजीनामा दिला होता. तसेच राज्यातील अनेक मुस्लिम पदाधिकारी राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पुण्यातील महत्वाच्या नेत्यांना आज शिवतिर्थावर बोलावले आहे. मात्र मनसेचे नगरसेवक आणि पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना निमंत्रण न दिल्याची माहिती समोर येत आहे. 
राज ठाकरेंनी पुण्यातील मनसेचे नेते राजेंद्र वागसकर, अनिल शिदोरे आणि मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांना मुंबईत बोलावलं आहे. मात्र पुण्यातील मनसेतील मोठं नाव असलेल्या वसंत मोरे यांना निमंत्रण न दिल्याचं सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, राज ठाकरे यांच्या भाषणामुळे अन्य राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडणे, त्यांनी टीका करणे समजण्यासारखे आहे, मात्र पक्षाच्याच नगरसेवकांनी त्या भाषणामुळे मी बेचैन आहे असे म्हणणे योग्य नाही, असे मत मनसेचे नेते बापू वागसकर यांनी सांगितले. ९ मार्चला ठाण्यात आयोजित सभेत खुद्द पक्षाध्यक्ष राज ठाकरेच त्यावर बोलणार आहेत, त्यातून मोरे यांचे समाधान होईल, असे ते म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: