दृष्टिहिनांच्या बुद्धिबळ महासंघाला स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळावा – डॉ. मनीष थूल

पुणे : दृष्टिहिनांच्या अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाला (ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर ब्लाइंड – AICFB) जर केंद्र सरकार कडून स्वतंत्र राष्ट्रीय क्रीडा संघटनेचा दर्जा मिळाला तर दृष्टिहीन बुद्धिबळ खेळाडूंचा झपाट्याने विकास होईल असे ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर ब्लाइंडचे महासचिव डॉ. मनीष थूल यांनी सांगितले.

पी वाय सी हिंदू जिमखाना येथे ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर ब्लाइंड आणि रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजद्वारे आयोजित करण्यात आलेल्या दृष्टिहिनांच्या सावा हर्बल AICFB राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त डॉ. थूल यांच्याशी दृष्टिहीनांच्या बुद्धिबळ उपक्रमांविषयी माहिती घेण्याची संधी मिळाली.

ते म्हणाले, आम्हाला क्रीडा मंत्रालयाकडून पाठिंबा मिळतो, परंतु एक-खेळ-एक-संघटना या धोरणानुसार, आम्ही अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अंतर्गत येतो. वेगवेगळ्या कारणांसाठी साधारणपणे आम्हाला दर वर्षी दीड कोटी रुपयांचा निधीची आवश्यकता असतो. परंतु दरवर्षी आम्हाला फक्त दहा लाख रुपये मिळतात. या निधीचा विनियोग बहुतेक वेळेला खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय सहभागासाठी वापरला जातो. आमची निधीची गरज आणि प्रत्यक्षात मिळणारा निधी यांच्यातील तफावत खूप जास्त असल्याने आम्हाला विविध स्पर्धा आयोजित करण्यासाठी खाजगी प्रायोजकांवर अवलंबून राहावे लागते. जर शासनाकडून अधिक निधी मिळाला तर आपोआपच आम्हाला आमच्या संघटनेच्या कामाची व्याप्ती वाढवता येईल.

डॉ थूल पुढे म्हणाले, सध्या दृष्टीहिनांच्या बुद्धिबळाचा विकास शहरी भागात पोहोचला असला तरीही ग्रामीण भागात आम्हाला अधिकाधिक नैपुण्य शोध आणि विकास कार्यक्रमावर भर देण्याची आवश्यकता आहे. आर्थिक निधीच्या अभावी असे कार्यक्रम आयोजित करणे हे एक आव्हानच असते. आर्थिक निधीअभावी ग्रामीण भागातील नैपुण्य शोधास खूप मर्यादा येत असतात आणि या भागात नैपुण्य असूनही आम्हाला अपेक्षेइतका त्यांचा विकास करता येत नाही.

डॉ. थूल म्हणाले की सध्याचे केंद्र सरकार पॅरा आणि दिव्यांग खेळाडूंसाठी खूप काही करत आहे.  दृष्टिहीन खेळाडूंच्या प्रयत्नांना मान्यता देऊन त्यांना रोख पारितोषिके दिली आहेत. ही बाब अत्यंत स्वागतार्ह आहे. तथापि, दृष्टिहीन खेळाडूंच्या बुद्धिबळ स्पर्धेत यश मिळवणाऱ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या तर अशा खेळाडूंना आणखी प्रेरणा मिळेल.

भविष्यातील योजनांबाबत डॉ. थूल म्हणाले की, त्यांचे सॉफ्टवेअर आणि मोबाइल ॲप्लिकेशन्स अपडेट करणे हे त्यांच्या खेळाडूंचा आधार मजबूत करण्यासाठी आणि डिजिटल माध्यमातून प्रशिक्षण देण्यासाठी महत्त्वाचे ठरेल.

आम्ही २००० च्या दशकाच्या सुरुवातीला AICFB चे अध्यक्ष चारुदत्त जाधव यांच्या मदतीने एक सॉफ्टवेअर विकसित केले होते. आमच्याकडे आता आमच्या बुद्धिबळपटूंसाठी चेस मित्रा मोबाईल ऍप्लिकेशन आहे, जिथे ते खेळू शकतात, शिकू शकतात आणि त्यांचे विश्लेषण करू शकतात. यामुळे देशातील अनेक खेळाडूंना मदत होत आहे आणि अनेकांपर्यंत पोहोचण्यास वाव आहे. परंतु तंत्रज्ञान खूप वेगाने पुढे जात आहे आणि अनुप्रयोग आणि सॉफ्टवेअर अपग्रेड करणे खूप महाग आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: