fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात श्री वल्लभेश मंगलम् विवाह सोहळा थाटात

पुणे : शुभमंगल सावधान चे मंगल सूर… अक्षता आणि गुलालाची मुक्त उधळण… ब्रह्मवृंदांनी केलेले मंत्रपठण आणि पारंपरिक वेशातील व-हाडी मंडळी अशा उत्साही वातावरणात चैत्र शुद्ध द्वितीयेला दुपारी १२ वाजून ५६ मिनिटांनी श्री वल्लभेश मंगलम् हा श्री गणेश आणि देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा दगडूशेठ गणपती मंदिरात थाटात पार पडला.

 श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे भगवान श्री गणेश व देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा रविवारी मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, अक्षय गोडसे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. श्री देवदेवेश्वर संस्थानचे रमेश भागवत व पुणे वेदपाठशाळा बुधवार पेठचे वझे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली युवा ब्रह्मवृदांनी तसेच वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांनी विवाह सोहळ्याचे पौरोहित्य केले.

श्री गणेश व देवी वल्लभा यांच्या मूर्ती सभामंडपात ठेऊन सर्व पारंपरिक विधी पार पडले. ब्रह्मवृंदांनी केलेल्या मंत्र पठणाने या विवाह सोहळ्याला वेगळी उंची प्राप्त झाली. सभामंडपात विविधरंगी पडद्यांची व फुलांची आकर्षक आरास करुन लग्नमंडपाचे स्वरुप देण्यात आले होते. ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते पारंपरिक वेशात लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते.

भगवान श्री गणेशाच्या शक्तींचा उल्लेख केला की आपल्या डोळ्यासमोर देवी सिद्धी आणि बुद्धी यांचा विचार येतो. तथापि गाणपत्य संप्रदायात श्री गणेशांच्या विविध शक्तींचा उल्लेख केलेला आहे. परब्रह्म परमात्मा भगवान श्री गणेश आपल्या स्वानंदेश स्वरूपात एकटे एकटे विद्यमान असतात. कधीतरी त्या परमात्म्याला अनेकत्त्वाची इच्छा जागृत होते. या इच्छेला उपनिषदांनी एकोऽहम! बहुस्याम! अशा स्वरूपात वर्णन केले. ब्रह्मणस्पतीला अशी इच्छा झाल्यावर त्या इच्छापूतीर्साठी ते आपल्या योगमायेला जागृत करतात. ही त्यांची योगमायाच देवी वल्लभा नावाने ओळखली जाते. ती मोरयाची अत्यंत प्रिय असल्याने तिला वल्लभा असे म्हणतात.

एकट्याच मोरयाच्या स्वरूपात सर्व विश्वाचा आरंभ आहे. आता या मायेचा रूपात दोन स्वरूपात नटलेला असतो. त्यामुळे या देवी वल्लभेच्या प्रगटीकरणाची, मोरयाने तिच्यासह नटण्याची तिथी चैत्र शुद्ध द्वितीया असते. निर्गुण निराकार त्रिगुणातीत परब्रह्म म्हणजे भगवान श्री गणेश. तर आत्ममायायुक्त सगुण साकार त्रिगुणात्मक परब्रह्म म्हणजे श्री गुणेश. देवी वल्लभा आणि तिने युक्त असणा-या भगवान वल्लभेशांच्या महामीलनाचा महोत्सव म्हणजे वल्लभेश मंगलम आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading