fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRA

हिंदूंचाही सन्मान झालाच पाहिजे -चंद्रकांत पाटील

कोल्हापूर :बाकी सर्व धर्मांचा सन्मान करायचा आणि केवळ हिंदूंवर बंधने लादायची असे चालणार नाही. सर्वधर्मसमभावामध्ये हिंदूंचाही सन्मान झाला पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केले.
 
ते म्हणाले की, देशात सर्वधर्मसमभाव किंवा धर्मनिरपेक्षता यांचे इतके स्तोम वाढले की हिंदूंना हिंदू म्हणवून घेण्याची लाज वाटू लागली. हिंदू म्हणजे बुरसटलेले, असे देशात सातत्याने पुस्तके, शिक्षण व भाषणातून मांडले गेले. जातीय तेढ निर्माण होऊ नये हे केवळ हिंदूनी सांभाळले पाहिजे असे झाले. पण सर्वधर्मसमभाव म्हणजे केवळ मुसलमानांचा सन्मान करायचा पण हिंदूंचा सन्मान करायचा नाही, असे चालणार नाही. तुम्ही आमच्या आरतीचा सन्मान करा, आम्ही तुमच्या अजानचा सन्मान करू. आपण एकत्र प्रेमाने राहू. पण सर्वधर्मसमभावामध्ये हिंदूंचाही सन्मान झाला पाहिजे.
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे गुढीपाडव्याचे भाषण हे सामान्य हिंदूंच्या मनाला सुखावणारे होते. त्यांच्या भाषणामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आली, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत  पाटील यांनी व्यक्त केली.
 कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला गती आली आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार, भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले कोल्हापुरात प्रचारासाठी येतील. याखेरीज पक्षाचे अनेक नेते मतदारसंघात प्रचारासाठी येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading