मुलांना नकार पचविण्याचा व सहनशीलतेचा संस्कार देणे महत्वाचे-  बालसाहित्यिका आश्लेषा महाजन 

पुणे : आज शालेय वयातील मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. या मुलांवर आपण संस्कार करायला, त्यांना जगण्याचे बळ देण्यासाठी कमी पडलो का? याचा विचार केला पाहिजे. तसेच आजच्या काळात मुलांवर नकार पचविण्याचा, सहनशीलतेचा संस्कार आपण केला पाहिजे, असे मत बालसाहित्यिका आश्लेषा महाजन यांनी केले.

नैतिक शिक्षण समिती पश्चिम महाराष्ट्र तर्फे प्रा.संजय मुरदाळे लिखित संस्कारदीप या पुस्तिकेचे प्रकाशन सदाशिव पेठेतील पेरुगेट मुलांचे भावे हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनायक देशपांडे, लेखक प्रा.संजय मुरदाळे, स्वाती मुरदाळे, पांडुरंग राऊत, अ‍ॅड.सतीश गोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.

विनायक देशपांडे म्हणाले, चांगल्या संस्काराने तुम्ही घडता तसेच वाईट संस्काराने तुम्ही बिघडता देखील. प्रथम घर नंतर शाळा आणि आजूबाजूची परिस्थिती ही संस्काराची माध्यमे आहेत. त्यामुळे घर ही सर्वात महत्वाची संस्कार शाळा आहे. जर घरात, शाळेत आणि आजूबाजूला चांगल्या संस्कारांची परिस्थिती निर्माण झाली, तर कृत्रिम संस्कारवर्गांची गरज भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

प्रा. संजय मुरदाळे म्हणाले, लहान मुलांसाठी लेखन करताना त्यांच्या भावविश्वात जाऊन लेखन करावे लागते. त्यांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांना देशाचा पराक्रम, संतांनी केलेले महान कार्य समजावून सांगावे लागते, याकरीता सोप्या भाषेत कथा, कविता या पुस्तकात लिहिल्या आहेत. संस्काराचे जाळे देशभर कसे निर्माण करता येईल हा उद्देश समोर ठेवून पुस्तकाचे लेखन असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक गावात, वस्तीत, सोसायटीत, मंदिरात व समाजमंदिरात संस्कार वर्ग घेण्याचे प्रयत्न नैतिक शिक्षण समिती पश्चिम महाराष्ट्र तर्फे केले जात आहेत. हे संस्कारवर्ग घेण्यासाठी उपयुक्त अशी ही पुस्तिका आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: