सौ सोनार की, एक लोहार की, आमच्याकडेही भाजप विरोधातील मसाला तयार; नाना पटोलेंचा ईडी कारवाईवरुन भाजपला इशारा
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरी आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. या पार्श्वभूमीवर ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्राविरोधी आणि समाजाविरोधी धोरणांविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांचे तोंड बंद करण्याचा मोदी सरकार प्रयत्न करत आहेत’, अशी टीका कॉंग्रेस प्रेदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच भाजपच्या कटकारस्थानाविरोधात आमच्याकडेही मसाला तयार करण्यात आला आहे. आम्हीसुद्धा दणका देणार, असा स्पष्ट इशारा नाना पटोले यांनी भाजपला दिला आहे.
ईडीची कारवाई ही अघोषित आणीबाणी
नाना पटोले म्हणाले, सौ सोनार की, एक लोहार की, आमच्याकडेसुद्धा मसाला तयार आहे. भाजपच्या कटकारस्थाना विरोधात लवकरच मोहिम आखणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ईडीची कारवाई ही अघोषित आणीबाणी असून त्याच्याविरोधात उद्रेक होणं निश्चित आहे. भाजप देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करतंय. मोदींविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात रणनिती आखणार आहे. लोकशाहीमध्ये जनता मोठी असते. हे भाजपला कळायला हवं. यामुळे आता जनताच भाजपला धडा शिकवेल असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.
यूपीएचे अध्यक्षपद काँग्रेसच ठरवेल
राष्ट्रीय पातळीवर यूपीएचे अध्यक्ष शरद पवार यांना करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत नाना पटोलेंनी वक्तव्य केलं आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस आहे. भाजपला आणि मोदींना काँग्रेसच पर्याय आहे. यामुळे यूपीएचे अध्यक्षपद काँग्रेसच ठरवेल. आताची वेळ भाजपविरोधात लढायची आहे. कोण अध्यक्ष होणार किंवा नाही याची चर्चा करण्याची वेळ नाही असेही नाना पटोले म्हणाले.
