ग्रामीण भागातील शाळांना सक्षम केल्यानेच देश प्रगतीपथावर : डॉ.पी. ए. इनामदार

पुणे : ग्रामीण भागाला, तेथील विद्यार्थ्यांना, जिल्हा परिषद शाळा सक्षम केल्याशिवाय देशाची प्रगती शक्य नाही. माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताला जगात सर्वश्रेष्ठ करता येणे शक्य आहे. नव्या पिढीला सर्व प्रकारचे कौशल्य देण्याचा प्रयत्न आम्ही शिक्षण क्षेत्रात करीत आहोत. कर्तव्य भावनेनेच त्याकडे पाहिले पाहिजे.आयसीटी ला आपण स्पोकन इंग्लिश ची जोड देणे आवश्यक आहे. दुर्गम भागातील गुरुजींच्या योगदानाचा गौरव होत राहिला पाहिजे, असे मत महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए. इनामदार यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पी.ए .इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स ,डिझाईन अँड आर्ट्सच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘पै आयटी ऑलिंपियाड ‘ स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार हे अध्यक्षस्थानी होते. ​संस्थेचे सचिव प्रा.इरफान शेख, डॉ. ऋषी आचार्य, अंजुम काजळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषदांमध्ये माहिती तंत्रज्ञान शिकविणाऱ्या उमेश खोसे,मृणाल ​गंजाळे ,​ अॅड.​नागनाथ विभुते, प्रकाश चव्हाण, शफी शेख, आनंदा अनेमवाड यांना प्रत्येकी २ लाख रुपयांचा पै नॅशनल आय.टी. एज्युकेटर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.​एकूण १५ लाखांची पारितोषिके या समारंभात दिली गेली.

जिल्हा परिषद विद्यार्थी झाले ग्लोबल !

जिल्हा परिषद शाळातील या शिक्षकांनी माहिती तंत्रज्ञानासंबंधी अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केले. नागनाथ विभुते यांनी ‘लर्निंग विथ अलेक्सा’ उपक्रम केला होता. शफी शेख यांनी ‘ मित्र ‘ अॅप द्वारे अध्ययन सोपे केले. तसेच प्लास्टिक प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला. मृणाल गंजाळे यांनी ‘ पपेट इन एज्युकेशन ‘ उपक्रम अद्यापनात केला. आनंदा अनेमवाड यांनी स्वतःच्या पहिल्या पगारातून विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी लॅपटॉप घेतला. प्रकाश चव्हाण यांनी यू ट्यूब साधनांनी विद्यार्थ्यांना शिकवले. उमेश खोसे यांनी बंजारा समाजातील विद्यार्थ्यांना संगणक ज्ञानाने अवगत केले. या सर्व शिक्षकांनी कंपन्याच्या सीएसआर फंडातून शाळांना संगणक विषयक उपकरणे मिळवून दिली. अॅप तयार केले. स्काईपद्वारे परदेशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

डॉ.ऋषी आचार्य यांनी प्रास्ताविक केले. ताहीर शेख यांनी आभार मानले. तर बरखा जयसिंघानी यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: