मराठा सैनिकांच्या स्मारकांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढाकार घेणार – डॉ.नीलम गोऱ्हे
शिवछत्रपतींच्या पुतळ्याला विधानभवन आवारात शिवसेनेकडून पुष्पहार अर्पण
मुंबई : मराठा सैनिकांनी इतिहासात केलेली युद्ध आणि त्यात गाजवलेला त्यांचा पराक्रम कायम देशवासियांच्या स्मरणात रहावा आणि त्यांच्या पराक्रमाच्या स्मृती कायम चिरंतन राहाव्यात, या उद्देशाने मराठा सैनिकांची देशभरात स्मारके उभारण्यात आली आहेत. मात्र ही स्मारके आज अनेक वर्षांपासून दुरावस्थेत आहेत. या स्मारकांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे शिवसेना नेत्या व विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज सांगितले. तसेच या अनुषंगाने लवकरच पानिपत आणि उत्तर भारतातील काही स्थळांना भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आज शिवजयंतीनिमित्त विधान भवन आवारातील शिवछत्रपतींच्या पुतळ्याला विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सकाळी पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेनेचे विधानसभा प्रतोद आमदार सुनील प्रभू, आमदार राजन साळवी, आमदार . रवींद्र फाटक, आमदार महेश शिंदे, आमदार नरेंद्र दराडे आदी यावेळी उपस्थित होते.
