महाराष्ट्र शासनाची खान अकॅडमीसह भागीदारी सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचे गणित सुधारण्याचा उद्देश 

पुणे : महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आणि खान अकॅडमी इंडिया यांच्यात भागीदारी करण्यात आली. राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता १-१० पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गणित विषय सुधारणे हा या भागीदारीचा उद्देश आहे. त्यामुळे मराठी भाषेत गुणवत्तापूर्ण मॅथ साहित्य उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना स्वत:च्या भाषेत विषय समजवून घेणे सोपे झाले. महाराष्ट्राच्या ४८८ मॉडेल स्कूलमध्ये पहिल्या टप्प्यात हा नवीन गणित अभ्यास साहित्य तसेच अत्याधुनिक ऑनलाईन स्त्रोत राबवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, या सरकारी शाळांमधील सर्व शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण संसाधनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीनुसार व्यक्तिगत अभ्यास अनुभव उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षित केले जाईल.

महाराष्ट्र शासन आणि खान अकॅडमी इंडिया २०२१ पासून खान अकॅडमीच्या गुणवत्तापूर्ण मॅथ साहित्यावर काम करत असून ७००+ व्हीडिओ, लेख आणि सराव अभ्यास साहित्यांची पुनर्निर्मिती करून खान अकॅडमी समवेत एससीईआरटी महाराष्ट्रच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाचे सखोल ज्ञान वाढीस लागेल, ते स्वत:च्या वेगाने, कोणत्याही उपकरणावर मोफत शिकू शकतील. त्याशिवाय शिक्षकांसाठी आवश्यक ती साधने आणि सुनिश्चित वेळेत माहिती उपलब्ध असेल, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलनातील त्रुटी समजावून घेणे शक्य होईल, त्यांचे निराकरण वर्गातच, व्यक्तिगत स्तरावर करता येईल.

या भागीदारीचा भाग म्हणून खान अकॅडमीमधील टीम ही महाराष्ट्र शासनाचे २००० हून अधिक शिक्षक, ३६ जिल्हा गट अधिकारी आणि ४८८ प्राचार्यांसमवेत काम करून त्यांना शिक्षण पुरवते आहे. खान अकॅडमीने तयार केलेल्या अभ्यास साहित्याचा वापर आणि वर्गात गणित अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी शक्य होईल. महाराष्ट्रातील ४८८ शाळांमधील १,००,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक गणित अभ्यासाचे वातावरण यशस्वीरित्या राबविण्याचे लक्ष्य पहिल्या टप्प्यात राहील. पुढे आणखी शाळा आणि स्वतंत्र विदयार्थी याचा लाभ घेऊ शकतील. त्यांच्यासाठी संपूर्ण ग्रंथालय मोफत उपलब्ध राहील.

खान अकॅडमी उपक्रमाची सुरुवात आंतरराष्ट्रीय महिला दिनी शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र शासन वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्यांनी भागीदारीबद्दल मनापासून उत्सुकता प्रगट केली. “आपले विद्यार्थी हे समाज आणि देशाचे भवितव्य आहेत, त्यांना सर्वोत्तम शिक्षण आणि सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. खान अकॅडमीसारखी संघटना राज्य शासनासोबत भागीदारीत समान ध्येयावर काम करून उत्तम शिक्षणविषयक पायाभूत सुविधा निर्माण करते आहे, याचा मला आनंद वाटतो.”

या उपक्रमाविषयी बोलताना शिक्षण विभाग आयुक्त, विशाल सोलंकी म्हणाले की, “आमची खान अकॅडमी समवेतच्या भागीदारीचे उद्दिष्ट हे आमच्या विद्यार्थ्यांना मातृभाषेत तंत्रज्ञान-क्षम सुविधेमार्फत जागतिक दर्जाचे अभ्यास साहित्य उपलब्ध करून सर्वोत्तम शिक्षणविषयक पायाभूत सुविधा देण्याचे आहे. शाळा सुरू होत आहेत, आम्ही सर्वोत्तम वर्ग अनुभव उपलब्ध करून देत आहोत, विद्यार्थ्यांना वैयक्तिक अभ्यास पर्याय मिळाल्याने शिक्षणातील तूट भरण्यास हातभार लागेल.” त्याशिवाय एससीईआरटी संचालक, देवेंद्र सिंग म्हणाले की, “एससीईआरटी महाराष्ट्र संकेतस्थळावर नवीन गणित अभ्यास साहित्य उपलब्ध होणार असल्याचा आनंद वाटतो. त्याशिवाय खान अकॅडमीच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मोफत उपलब्ध होईल.”

या प्रगतीविषयी बोलताना खान अकॅडमीचे एमडी संदीप बापना म्हणाले की, “आम्हाला या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनासमवेत काम करताना सार्थ अभिमान वाटतो आहे. त्यामुळे सरकारी शाळांच्या शिक्षणविषयक गुणवत्तेत सुधारणा होणार आहे. मराठीत मोफत गुणवत्तापूर्ण शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या आमच्या द्रष्टेपणात एकत्रित काम करत आहोत. आम्ही राज्याने दिलेल्या मदतीबाबत त्यांचे आभारी आहोत. त्यांनी आमच्याकरिता शिक्षण स्त्रोत उपलब्ध करून दिल्याने मराठी मजकूर तयार होऊ शकला.”

Leave a Reply

%d bloggers like this: