क्रांतीकारकांच्या शौर्याची स्तंभांच्या माध्यमातून होते आठवण- मंदार लवाटे यांचे मत

पुणेः क्रांतीकारकांच्या शौर्याची आठवण करून देणारे हे स्तंभ आहे. दुर्दैवाने आपण या स्मृती स्तंभाला विसरलो आहे. जेव्हा आपण इथून जाऊ, तेव्हा या स्मृती स्तंभाची आठवण इतरांना करून देवू आणि त्यांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहचवू. शाळांमध्ये जाऊन त्यांच्या कार्याचा गौरव आणि इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला पाहिजे. त्यांच्याच प्रमाणे आपण देश आणि धर्मासाठी काम केले पाहिजे, असे मत इतिहास तज्ज्ञ मंदार लवाटे यांनी केले.

सामर्थ्य प्रबोधिनीच्यावतीने सेव्ह हेरिटेज या उपक्रमांतर्गत हुतात्मा स्मारक आणि पुण्यनगरीचे क्रांतिकारी चळवळीतील योगदान या विषयावर हेरीटेज वॉकचे आयोजन केले होते. यावेळी (हुतात्मा चौक) मजूर अड्डा येथील स्मृतीस्तंभाजवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी फरासखाना पोलीस स्टेशनचे कुंडलिक साहेब, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, शाहीर हेमंत मावळे, मनपा हेरिटेज विभागाचे केदार साठे, सामर्थ्य प्रबोधिनीचे अध्यक्ष सुशांत भिसे, हेरिटेज सेलचे अध्यक्ष स्वप्निल नहार, विविध संस्थांचे प्रतिनिधी, इतिहास आणि वारसा प्रेमी आदी उपस्थित होते.

यावेळी मंदार लवाटे यांनी वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर, शिवराम हरी राजगुरू, सुखटणकर, भास्कर पांडुरंग कर्णिक, आगाशे, बेंद्रे, निळूभाऊ लिमये, चिंतामणी दिवेकर, हॉटसन गोगटे अशा अनेक क्रांतीकारकांच्या कार्याचा इतिहास जागविला.

स्वप्नील नहार म्हणाले, सामर्थ्य प्रबोधिनीच्या सेव्ह हेरिटेज उपक्रमा अंतर्गत मनपा प्रशासन, पोलिस, स्मारकाभोवतीचे लोक-व्यापारी यांच्या बरोबर निवेदन, संवाद साधून एका महिन्यात स्वच्छता, रंगरंगोटी, माहिती फलक असा मोठा बदल होवून स्मारकास गतवैभव प्राप्त झाले. प्रबोधिनीच्या पुढाकारातून हुतात्मा स्मारकास गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केल्याचे समाधान वाटते. क्रांतिकारी कट्टा हा क्रांतिकारी, हुतात्मा यांच्या विचारांना चालना देणारा आहे. त्यांचे कार्य जगात पोहचवे म्हणून वारसा जतनाच्या या चळवळीत भविष्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे ही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: