fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

स्काऊट हा सैन्यदलातील सर्वात महत्वाचा घटक – ब्रिगेडियर सुनील लिमये (निवृत्त)

पुणे : शत्रूच्या प्रदेशात जाऊन टेहळणी करणे. सैन्यातील जवानांच्याही पुढे जाऊन सर्व माहिती मिळविण्याचे काम स्काऊट करतात. स्काऊट होण्याकरीता शरीराने, मनाने सुदृढ असणे गरजेचे आहे. तसेच उत्तम निरीक्षणशक्ती देखील असायला हवी, तरच सैन्यात स्काऊट होता येते. त्यामुळे स्काऊट हा सैन्यदलातील सर्वात महत्वाचा घटक आहे, असे ब्रिगेडियर सुनील लिमये (निवृत्त) यांनी सांगितले.

सदाशिव पेठेतील श्री शिवाजी कुल, पुणे या स्काऊट गाईड खुल्या पथकाच्या १०३ व्या वर्धापनदिनानिमित्त टिळक स्मारक मंदिर येथे कुलरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवात यंदाचा बाल कार्य सन्मान गरवारे बालभवन संस्थेला प्रदान करण्यात आला. गरवारे बालभवनच्या डॉ.श्यामला वनारसे व शोभा भागवत यांनी हा पुरस्कार स्विकारला. यावेळी महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा, श्री शिवाजी कुल माजी कुलवीर संघाच्या अध्यक्षा अपर्णा जोगळेकर, नरेंद्र धायगुडे, माधव धायगुडे, श्री शिवाजी कुलाच्या कुलमुख्य श्रेया मराठे, अरुंधती जोशी, श्रावणी कदम आदी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, पुस्तक असे सन्मानाचे स्वरुप होते.

सुनील लिमये म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत हार मानायची नाही, हे प्रत्येकाने मनाशी पक्के ठरवायला हवे. सामान्य ज्ञानासोबतच सर्व प्रकारचे वाचन मुलांनी करायला हवे. त्यातून लहानपणी मुलांच्या ज्ञानात भर पडेल. अभ्यास, वाचनासोबतच खुल्या मैदानात जाऊन मुलांना अनेक पालक संधी देत असल्याची बाब देखील कौतुकास्पद आहे.

शेखर मुंदडा म्हणाले, तब्बल १०३ वर्षे एखादी संस्था चालविणे व त्यात सातत्य ठेवणे हे मोठे काम आहे. स्काऊट शिक्षण ही आजची गरज आहे. अभ्यासाव्यतिरिक्त इतर सामान्य ज्ञान व मैदानावरील प्रात्यक्षिके हे स्काऊटिंगमध्ये प्रामुख्याने शिकविले जाते. आज पालकांनी मुलांशी मोठया प्रमाणात संवाद साधण्याची गरज असून वेळोवेळी मुलांचे कौतुक करुन त्यांना प्रोत्साहित देखील करायला हवे.

सन्मानाला उत्तर देताना शोभा भागवत म्हणाल्या, बालभवनमध्ये काम करण्यासाठीच मी जन्माला आले आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने श्रद्धधेने काम केल्यानेच बालभवन आजही टवटवीत राहिले आहे. शिस्त व मूल्य सांभाळून येथील कार्यकर्ते काम करीत असल्याने मुलांना चांगले संस्कार देण्याचा आम्ही प्रयत्न करतो, असेही त्या म्हणाल्या. ज्ञानेश वैद्य यांनी सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. कुलरंग कार्यक्रमात कुलवीरांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम देखील झाले. निखील चिंचकर यांनी कुलरंग कार्यक्रमाचे निवेदन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading