‘स्वरकीर्ती’ कार्यक्रमातून कलावंतांनीं जागविल्या कीर्ती शिलेदार यांच्या आठवणी
पुणे : ‘सुभद्रा’, ‘रुक्मिणी’, ‘भामिनी’, ‘शकुंतला’, ‘मंथरा’, ‘द्रौपदी’, ‘वसंतसेना’, ‘रेवती’, ‘मैना’ आणि ‘कान्होपत्रा’ अशा विविध रुपातील कीर्ती शिलेदार या संगीत रंगभूमीवरील स्वरसम्राज्ञीला दृकश्राव्य माध्यमातून ऐकायला आणि पहायला मिळाल्याने ज्येष्ठ मंडळी सुरेल आठवणींमध्ये रमली तर तरुणाई अचंबित झाली. निमित्त होते ते कलाद्वयी पुणेतर्फे स्वरसम्राज्ञीला वंदन करण्यासाठी आयोजित ‘स्वरकीर्ती’ या कार्यक्रमाचे!
स्वरसम्राज्ञी कीर्ती शिलेदार यांना आदरांजली वाहण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिलेदार यांनी सादर केलेल्या अकरा नायिकांची पदे दृकश्राव्य माध्यमातून या कार्यक्रमात दाखविण्यात आली तर ज्येष्ठ ऑर्गनवादक संजय देशपांडे, संजय गोगटे, ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा जोगळेकर, प्रसिद्ध अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर, अभिनेते संजय गोसावी, गायक अभिनेता निनाद जाधव, तबलावादक विद्याधर देशपांडे यांनी शिलेदार यांच्या आठवणींना उजाळा दिला.
कीर्ती शिलेदार यांनी 32 संगीत नाटकांमध्ये विविध भूमिका साकारल्या असून या नाटकांचे चार हजारावर प्रयोग झाले असून त्यांनी सहजसुंदर अभिनय आणि गोड आवाजाने रसिकांच्या मनावर अनेक वर्षे अधिराज्य केले. पारंपरिक संगीत नाटकांच्या सादरीकरणात बदलत्या काळानुसार नवनविन प्रयोग हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
अस्मिता चिंचाळकर म्हणाल्या, कीर्तीताईंबद्दल आदरयुक्त भीती होती, ‘स्वयंवर’मधील रुक्मिणी’ ही भूमिका साकारताना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संयमीत आणि शांत व्यक्तीमत्व असलेल्या कीर्तीताई त्या-त्या भूमिकेशी एकरूप व्हायच्या. शास्त्रीय संगीताचा पक्का पाया असलेल्या कीर्तीताई संगीत रंगभूमीवरील आम्हा कलाकारांसाठी आदर्श होत्या.
अतिशय क्लिष्ट भाषा असलेली बालगंधर्व यांची संगीत नाटके शिलेदार यांनी त्यांच्या काळात गाजविली, अशी आठवण संजय देशपांडे यांनी सांगितली. शिलेदार कुटुंबियांनी गंधर्व पद्धतीचा वारसा चालविताना बालगंवर्धांचे अनुकरण केले नाही तर स्वत:चा एक वेगळा ठसा उमटविला.
सहअभिनेत्री म्हणून सहवास लाभलेल्या वर्षा जोगळेकर यांनी कीर्ती शिलेदार यांच्या सहवासातून मिळालेला आनंद आणि त्या कशा भावल्या या विषयी मनोगत व्यक्त करून प्रत्येक नायिकेचा स्वभावविशेष लक्षात घेऊन अभिनयातले बारकावे शोधत असे, त्यामुळे कीर्तीने प्रत्येक नायिका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली होती, असे आवर्जून नमूद केले.
जयमालाबाई व कीर्तीताई यांनी अनेक प्रचलित पदे ऐकवली तसेच त्यांच्या नोटेशनसह संथा दिली, असे संजय गोगटे यांनी सांगितले.
निनाद जाधव म्हणाले, सहकलाकाराला त्याच्या भूमिकेमागील भाव, विचार कसा व्यक्त करायचा हे त्या मोठ्या खुबीने समजावून देत असत. पदाच्या रसाप्रमाणे नटाने व्यक्त झाले पाहिजे, त्यातील भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, शब्दांचा अर्थ पूर्ण झाला पाहिजे या विषयी त्या आग्रही असत.
स्वत:ला विसरून जे पात्र साकारणार आहोत त्या पात्राशी एकरूप होऊन भूमिका करा असा सल्ला कीर्तीताई देत असत असे संजय गोसावी यांनी सांगितले.
विद्यानंद देशपांडे म्हणाले, कीर्तीताई यांची तालावर हुकुमत होती, त्या उत्तम तबला वाजवायच्या. पदांच्या रचनेप्रमाणे कुठल्या ठेक्यावर जोर दिला पाहिजे याचे त्यांना उत्तम ज्ञान होते. पद्य, वाद्य आणि गद्य या तीनही प्रांतात त्यांचे प्रभुत्व होते. त्या रंगभूमीवरील स्वरसम्राज्ञीच होत्या, असे सांगून त्यांनी कीर्तीताईंवर केलेले काव्य सादर केले.
