fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

वेश्या व्यवसायातील महिला आपल्यापेक्षा लहान ठरत नाहीत – डॉ. रमण गंगाखेडकर

पुणे : माणसाने माणसाला बरोबरीची वागणूक द्यायला हवी. वेश्या व्यवसाय करणारे आपल्यापेक्षा लहान ठरत नाही, हे जोपर्यंत आपल्याला वाटणार नाही तोपर्यंत आपली उन्नती होणार नाही. आज स्वच्छच्या माध्यमातून या महिला कचरा साफ करत आहेत, परंतु लोकांच्या मनात या महिलांबद्दल जो विचारांचा कचरा आहे. तो आपण सगळे मिळून साफ करुया, असे मत पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केले.

पुण्यातील बुधवार पेठेतील सहेली संघाच्या वतीने नवी पेठेत पत्रकार भवन येथे क्लिन रेड प्रकल्पाच्या वर्षपूर्ती निमित्त छायाचित्र कथा प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सहेली संघ, ए.एस.आर सर्व्हिसेस आणि स्वच्छ च्या सहकार्याने क्लीन रेड हा एक वेगळा उपक्रम गेल्या एक वर्षापासून सुरू आहे.

वेश्याव्यवसाय सोडू इच्छिणार्‍या महिलांना सबळ रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या या प्रकल्पाला यशस्वीपणे १ वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहेली संघाच्या कार्यकारी संचालिका तेजस्वी सेवेकरी, सहेली संघाच्या अध्यक्षा महादेवी मादर, डॉ.हेमंत आपटे, ए.एस.आर सर्व्हिसेसचे तेजस भोसले, स्वच्छचे आलोक गोगटे, विलू पूनावाला चॅरीटेबल फाउंडेशनचे विजय कोल्हटकर उपस्थित होते.

डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी विविध योजना राबवून जर त्यांना सन्मानाचे स्थान मिळवून दिले, तर त्याही विचार करतील की दुस-या प्रकारे देखील मेहनतीच्या जोरावर पैसे कमवू शकतो. कोणतीही बाई या व्यवसायात आनंदाने जात नसते. त्यामुळे या महिलांसाठी काय करता येईल, याचा विचार देखील समाजातील नागरिकांनी करायला हवा.

तेजस्वी सेवेकरी म्हणाल्या, वेश्या व्यवसाय सोडून इतर काही काम मिळवण्याचा प्रयत्न अनेक महिला करत असतात पण समाजाकडून ,मिळणारी अवहेलना नकारात्मक दृष्टिकोन तसेच उपजीविकेचे ठोस पर्यायांचा अभाव यामुळे अनेक मर्यादा येतात. आयुष्याची गुंतागुंतीची रचना समजून घेऊन त्यांना इतर सबळ पर्याय मिळवून देणे हे नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे.

सहेली संघाने ही संकल्पना मांडून पुढाकार घेतला असताना अशा वेळेस तीन संस्था एकत्र येऊन ठामपणे उभ्या राहिल्या. अशावेळी ज्यांना स्वतःहून धंदा सोडून दुसरे काही काम करायचे आहे त्यांच्यासाठी सशक्त पर्याय उभा राहतो. या प्रक्रियेचा आविष्कार म्हणजे क्लिन रेड प्रकल्प आहे. यापुढेही अधिक चांगल्या पद्धतीने तिन्ही संस्था मिळून काम करत राहतील, असेही त्यांनी सांगितले. निलीमा करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading