fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

पुणे : वसतिगृहातील जुन्या आठवणी… केलेल्या कमवा व शिका, चार तास काम… सांस्कृतिक कार्यक्रमांत केलेली मौज मस्ती… वेगवेगळ्या क्षेत्रांत मिळवलेल्या यशाचं कौतुक आणि आज करीत असलेल्या कामाची, मुलाबाळांची माहिती एकमेकांना सांगताना चेहर्‍यावरचा विलक्षण आनंद ओसंडून वाहत होता.
निमित्त होतं, विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने आयोजित माजी विद्यार्थी ३३ व्या मेळाव्याचे. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी आणि कृषी व पाणलोट क्षेत्रात कार्यरत शिवाजी तळेकर, तर ज्येष्ठ माजी विद्यार्थी आणि मुंबई येथील जीएसटी उपायुक्त गणपत (अण्णा) वावरे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, मंडळाचे अध्यक्ष राजू इंगळे आदी उपस्थित होते.
मेळाव्याच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करताना ज्येष्ठ कार्यकर्ते व कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकर्ते डॉ. संभाजी भावसार, कर्मचारी लक्ष्मी क्षीरसागर यांना, तसेच मंडळाचे देणगीदार कल्याणी टेक्नोफोर्जचे संचालक अनंत चिंचोळकर, माजी विद्यार्थी विजय कदम व अंजली साठे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. अरुण कोंडेजकर पुरस्कृत आदर्श विद्यार्थी पुरस्कार मयूर हाडवळे, ऍड. दौलत इंगवले व रत्नाकर मते पुरस्कृत आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार परवीन आतार व वैष्णवी देशमुख यांना प्रदान करण्यात आला.
यंदाच्या मेळाव्याचे प्रायोजकत्व सोलापूर जिल्ह्यातील माजी विद्यार्थ्यांकडे होते. मंडळाच्या सहकार्यवाह मनीषा गोसावी, सहखजिनदार गणेश काळे, सोलापूर टीममधील समन्वयक नंदकुमार तळेकर, गणेश ननवरे, डॉ. मोहन अमृळे, डॉ. प्रकाश दीक्षित, बबन अमृळे, प्रशांत शिंदे यांनी मेळावा यशस्वी करण्यात कठोर परिश्रम घेतले.
तुकाराम गायकवाड यांनी समितीच्या भावी योजना आणि आव्हाने विशद केली. नवीन वसतिगृहाच्या उभारणी विषयी माहिती दिली. राजू इंगळे यांनी मंडळाच्या उपक्रमाची माहिती दिली. आजी व माजी विद्यार्थ्यांच्या हितासाठी मंडळ पुढील काळात काम करणार असल्याचे नमूद केले. नंदकुमार तळेकर यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. कार्यवाह सुनील चोरे यांनी मंडळाच्या कार्याचे, तर खजिनदार संतोष घारे यांनी आर्थिक अहवालाचे वाचन केले. निसार चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष अनिल खेतमाळीस यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading