Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

युक्रेनमध्ये अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश

नवी दिल्ली :  युक्रेनमधील युध्दजन्य परिस्थितीत अडकलेले २५० भारतीय विद्यार्थी आज मायदेशी परतले. यामध्ये महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन दुसरे विशेष विमान आज सकाळी 9 वाजता आले. 

सद्या युक्रेनमधील अतिसंवेदशील परिस्थितीमुळे तिथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी ‘ऑपरेश गंगा’ ही विशेष मोहीम भारत सरकारने सुरु केली आहे. या अंतर्गत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्यावतीने पाठविण्यात आलेल्या एयर इंडियाच्या ‘एआय-1940’ या विशेष विमानाने 250 विद्यार्थी आज सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले आहेत. यामध्ये विविध राज्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 18 विद्यार्थी आहेत. सायंकाळी सहा वाजता पुन्हा  येणाऱ्‍या विशेष विमानामध्ये राज्यातील 4 विद्यार्थी परत येणार आहेत.

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष

युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे, यासाठी दिल्लीतील महाराष्ट्र शासनाच्या, महाराष्ट्र सदनाच्या वतीने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून पोहोचविण्यासाठी विमानाचे तिकीट काढून देण्यात येत आहे. 

युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांना आप-आपल्या राज्यात सुखरुप पोहचता यावे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading