आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या गायनाने कलाश्री महोत्सवाची सांगता
पुणे : ‘कलाश्री संगीत मंडळ’तर्फे आयोजित महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांचे शास्रीय गायन आणि विराज जोशी यांचे शास्रीय गायन झाले. नवी सांगवी येथील निळू फुले सभागृहात तीन दिवस हा सांगितीक कार्यक्रम रसिकांना अनुभवला. यंदाचा ’२४ वा कलाश्री पुरस्कार’ ज्येष्ठ बासरीवादक पं. केशव गिंडे यांना तर ‘कलाश्री युवा पुरस्कार’ भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कलाश्री संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे गायन व वादन सादर झाले. यानंतर विराज जोशी यांनी शास्रीय गायन सादर केले. सुरुवातीला त्यांनी राग पुरिया धनश्रीचा बडाख्याल ‘सुमिरो तेरो नाम’ विलंबित एकलाताला सादर केला. त्यानंतर अल्हैया बिलावलमधील ‘तिरथ को चले’ ही झपतालातील बंदिश गायली. शेवटी ‘आता कोठे धावे मन’ हा अभंग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गंगाधर शिंदे (संवादिनी), प्रशांत पांडव (तबला), सत्यवान पाटोळे व दिगंबर शेडुळे (तानपुरा) यांनी त्यांना साथसंगत केली.
यानंतर कलाश्री पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यंदाचा ‘२४ वा कलाश्री पुरस्कार’ ज्येष्ठ बासरीवादक पं. केशव गिंडे यांना अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष पं. विकास कशाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच ‘कलाश्री युवा पुरस्कार’ विराज जोशी यांना आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर उषा ढोरे, शिला देशपांडे, ज्येष्ठ साहित्यिक दीपक चैतन्य, अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाचे पांडुरंग मुखडे आदी उपस्थित होते.
यानंतर ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांचे शास्रीय गायन झाले. त्यांनी सुरुवातीला राग केदारमधील ‘पायो पायो मोरे राम नाम धन’ ही बंदिश गायली. त्यानंतर ‘राम नाम जपत हूँ मैं’ ही छोटा ख्यालमधील बंदिश सादर केली. यानंतर गायलेल्या तराण्याला रसिकांनी उत्स्फुर्त दाद दिली. भैरवीने त्यांनी महोत्सवाची सांगता केली.
