Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

पं. अतुलकुमार उपाध्याय यांच्या व्हायोलीन वादनाची भुरळ

पुणे : कलाश्री महोत्सवाचा दुसरा दिवस उस्ताद अर्षद अली खान यांचे शास्रीय गायन आणि पं. अतुलकुमार उपाध्याय यांच्या व्हायोलीन वादनाने श्रवणीय ठरला. ‘कलाश्री संगीत मंडळ’तर्फे ‘२४ व्या कलाश्री महोत्सव’चे आयोजन करण्यात आले असून नवी सांगवी येथील निळू फुले सभागृह येथे हा कार्यक्रम होत आहे.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ह. भ. प. तुकारामभाऊ, सच्चिदानंद कुलकर्णी, पं. कल्याण अपार, शशी सुधांशु, बाळासाहेब कुलकर्णी, प्रणाली विचारे, समीर महाजन, मोहन चांदणी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर कलाश्री संगीत मंडळाच्या विद्यार्थ्यांनी गायन आणि वादन सादर केले.

महोत्सवाचा दुसरा दिवस किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक उस्ताद अर्षद अली खाँ यांच्या शास्त्रीय गायनाने सुरू झाला. सुरुवातीला त्यांनी ‘राग पुरिया’ सादर केला. त्यानंतर ‘देस’ रागात ठुमरी सादर केली. त्यानंतर ‘बाजे रे मुरलिया बाजे’ या भजनाने पहिल्या सत्राची सांगता केली. त्यांना प्रशांत पांडव (तबला), अभिनय रवांदे (संवादिनी), शाश्वती झुरुंगे आणि दीपक गलांडे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात पं. अतुलकुमार उपाध्याय यांचे व्हायोलीन वादन झाले. उपाध्याय यांनी राग ‘मालकंस’ सादर करून कार्यक्रमात अधिक रंग भरले. त्यानंतर विलंबित तीनतालात ‘गत’ आणि नंतर दृत तालात ‘एक गत’ यात वादन केले. त्यानंतर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी गायलेली ‘रंग रलीया’ ही बंदीश सादर केली. ‘काफी’ रागात एक टप्पा वादन करून भैरवीमध्ये ‘जमुना के तीर’ ही ठुमरी सादर केली. भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पित करीत ‘पसायदान’ सादर करून दुसऱ्या दिवसाची सांगता केली. पं. मुकेश जाधव यांनी तबल्यावर समर्पक साथ दिली.

उद्या २० फेब्रुवारी रोजी महोत्सवाचा शेवटचा दिवस असून विराज जोशी यांचे व गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या शास्त्रीय गायनाने होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading