‘फिशपाँड’मध्ये मानसी मागीकर झळकणार बिनधास्त, रोमँटिक भूमिकेत
चित्रपट, मालिकांमधून सात्विक-सोज्वळ भूमिकेत रसिकांसमोर आलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री मानसी मागीकर बिनधास्त, बोल्ड आणि रोमँटिक मराठी फिल्ममध्ये झळकणार आहेत. 90 मिनिटांच्या या फिल्मचे नाव आहे ‘फिशपाँड’! ‘व्हॅलेंटाईन डे’चे निमित्त साधून ही फिल्म दि. 12 रोजी प्रदर्शित होत आहे.
कॉलेज जीवनातील पहिलं प्रेम सहसा कुणी विसरत नाही ते मनाच्या एका कप्प्यात कायम घर करून राहिलेलं असतं. अनेक वर्षे मनात रूंजी घालत असलेल्या या सुखद आठवणी ज्येष्ठत्वाकडे झुकलेल्या पण मनाने तरूण असलेल्या अव्यक्त प्रेमिकांच्या नजरेसमोर चित्ररूपात येतात आणि सुरू होते हळूवार नात्याची गुंफण. साठी उलटलेल्या मित्र-मैत्रिणीची ही कहाणी. कलाकारांच्या भूमिकांमधून मॅडनेस, कॉमेडी आणि बोल्डनेस अशा विविध छटा पहायला मिळणार आहेत. दीपक रेगे, मेधा गोखले हे कलाकार सुद्धा वेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. विनीता पिंपळखरे लेखन-दिग्दर्शन अशा दुहेरी भूमिकेत आहेत. दि. 12 फेब्रुवारीपासून तिकिट खिडकी डॉट कॉमवर ही फिल्म दाखविली जाणार आहे.
भूमिकेविषयी बोलताना मानसी मागीकर म्हणाल्या, नकारात्मक, आधुनिक स्त्रीची भूमिका कधीच माझ्या वाट्याला आली नाही. विविधांगी भूमिका मिळाव्यात अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. पण असे वाटते की, एखाद्या भूमिकेतून निर्माण झालेल्या व्यक्तिरेखेमुळे त्याच त्याच प्रकारच्या भूमिका वाट्याला येतात. भूमिकांमधून वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारायला मिळाल्यास कलाकाराला त्यातून निश्चितच आनंद मिळतो. या फिल्मध्ये एक वेगळी-आव्हानात्मक भूमिका साकारत आहे. स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी या भूमिकेच्या प्रेमातच पडले. या फिल्मद्वारे एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर येत असून त्यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळतो याची नक्कीच उत्सुकता आहे. मला आतापर्यंत संयमित-सोज्वळ भूमिका करण्याची सवय होती पण ‘फिशपाँड’मधील भूमिकेसाठी मी स्वत:ला चाकोरीतून बाहेर काढले. देहबोली बदलणे, आधुनिक पोषाख घालणे याकडे कटाक्षाने लक्ष दिले. सरावातून भूमिकेत मोकळेपणा येत गेला.
‘फिशपाँड’मधील नायिका बोल्ड असली तरी मर्यादा राखून आहे. सात्विक-सोज्वळ भूमिका करणार्या मानसी मागिकर या फिल्मद्वारे डॅशिंग-आव्हानात्मक भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. एका स्त्रीने व्यक्त केलेली ही वेगळी स्त्री आहे. मॅडनेस, कॉमेडी आणि बोल्डनेस अशा सूत्रात ही फिल्म बांधली असल्याचे विनीता पिंपळखरे यांनी सांगितले.
