पीएमपीएमएल’ला संचलन तुटीपोटी उचल
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाला चालू आर्थिक वर्षातील संचलन तुट अपवादात्मक बाब म्हणून उचल स्वरूपात देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, पीएमपीएमएल संस्थेला संचलन तुटीमुळे होणारा खर्च सन २०१३-१४ पासून महापालिकेच्या स्वामीत्व हिश्शानुसार (६० टक्के) दिला जातो. त्यानुसार गेल्या आर्थिक वर्षातील संचलन तूट या वर्षात दरमहा २० कोटी रुपये या प्रमाणे पीएएमपीएमएलला दिली जात आहे. कोरोना काळामुळे पीएमपीएमएलचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. महामंडळाचे संचलन विस्कळीत होऊ नये म्हणून पुणे महापालिकेकडून ८८ कोटी रुपयांची अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली होती.
रासने म्हणाले, पीएमपीएमएलला चालू आर्थिक वर्षातील संचलन तूट म्हणून ८८ कोटी रुपये आणि कोविड कालावधी आणि लवाद दाव्यानुसार देय असणारी १०७ कोटी रुपये अशा एकूण १९५ कोटी रुपयांपैकी चालू वर्षात १०० कोटी रुपयांची तूट उचल स्वरूपात अदा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. पुढील आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात यावर्षी जमा करण्यात आलेली संचलन तूट परत जमा करण्यात येणार आहे.
रासने पुढे म्हणाले, पीएमपीएमएलची सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतन देणे अवघड होणार आहे. कर्मचार्यांना हे वेतन देता यावे यासाठी दरमहा सहा कोटी रुपये पुढील वर्षी देण्यात येणार्या संचलन तुटीमधून अग्रीम स्वरुपात देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सुधारीत वेतनश्रेणेची थकबाकी देण्यासाठी महापालिकेच्या हिश्याची रक्कम २६१ कोटी ७६ लाख रुपये होते. ही थकबाकी पाच हप्तात देण्यासाठी पुढील पाच वर्षांच्या अंदाजपत्रकात दरवर्षी ५२ कोटी ३६ लाख रुपयांची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली.
