Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

उलगडले किराणा घराण्याचे अंतरंग

पुणे : ‘अभिवादन’ या सांगीतिक कार्यक्रमाचा दुसरा दिवस अभिषेक बोरकर यांचे एकल सरोदवादन, स्निती मिश्रा यांचे गायन आणि श्रीनिवास जोशी यांच्या सादरीकरणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा ठरला. कार्यक्रमातील आश्वासक तरुण कलाकारांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आयोजक असलेल्या आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी स्थापन केलेल्या आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत ‘अभिवादन’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजीनगर येथील सवाई गंधर्व स्मारक येथे हा कार्यक्रम पार पडला. 
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात अभिषेक बोरकर यांच्या बहारदार सरोदवादनाने झाली. राग भीमपलासने त्यांनी सादरीकरणास सुरुवात केली. विलंबित तीन ताल, ताल चंद्रिका यांचे  सादरीकरण त्यांनी केले. रोहित मुजुमदार यांनी त्यांना तबलासाथ केली. 

यानंतर स्निती मिश्रा यांचे गायन झाले. राग मालकंसने त्यांनी गायनाला सुरुवात केली. त्यांनी बडा ख्यालमध्ये “कोयलिया बोली रे अम्बुआ की डाल अपनो कोई नहीं रे”, छोटा ख्यालमध्ये दृत तालातील “हर हर महादेव महेश्वर” तसेच राग अडानामध्ये “होरी होरी खेलत नंदलाल” हा चतुरंग सादर केला. “पंढरीचा वास चंद्रभागी स्नान” या अभंगाने त्यांनी समारोप केला. अभिनय रवांदे ( संवादिनी), भरत कामत ( तबला), अभयसिंग वाघचौरे, दिगंबर जाधव ( तानपुरा) यांनी त्यांना साथसंगत केली.
यानंतर पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र आणि शिष्य श्रीनिवास जोशी यांच्या सादरीकरणात किराणा घराण्याचे अंतरंग उलगडले गेले. विराज जोशी यांनी त्यांना समर्पक गायन साथ केली.

श्रीनिवास जोशी यांनी यावेळी यमन राग, खमाज राग सादर केले. यमन रागात ‘कैसे सखी कैसे करीये’ ही बंदीश सादर केली. यावेळी पंडितजीच्या आठवणी सांगताना ते म्हणाले, “दामुभैय्या दाते म्हणायचे, भीमसेन नावाप्रमाणेच पंडितजींचे व्यक्तिमत्त्व भारदस्त होते. त्यामुळे ते गायले नसते तरीही ते भीमसेनच राहिले असते. त्यांच्या आवाजात स्वरमाधुर्यता, भारदस्तपणा, ताना आणि आनंदस्वर या सर्व गोष्टी सामावलेल्या होत्या.”
यावेळी श्रीनिवास यांनी खमाज रागात आपल्या वडिलांवर स्वतः रचलेली “सूर संग रंगरलिया करत है सावलिया” ही ठुमरी सादर केली. भैरवीने त्यांना आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. यावेळी त्यांना नीलेश रणदिवे (तबला), अविनाश दिघे (संवादिनी), अभयसिंग वाघचौरे, अजिंक्य देशपांडे (तानपुरा) यांनी साथसंगत केली. सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले. उद्या कार्यक्रमाच्या तिस-या व शेवटच्या दिवसाची (६ फेब्रुवारी) सुरुवात ही किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंद भाटे यांच्या गायनाने होईल. तर नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने पद्मविभूषण या देशातील दुस-या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केलेल्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे गायन होईल. भारतरत्न पं भीमसेन जोशी यांवरील एका विशेष चित्रफितीच्या सादरीकरणाने कार्यक्रमाचा समारोप होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading