Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

राज्य सरकार शिक्षण क्षेत्राला नियंत्रीत करून राजकीय अड्डा बनवू पाहत आहे – नागसेन पुंडगे

पुणे:आपले सर्व क्षेम कुशल असेल अशी खात्री आहे, कारण नुकतेच अनेक महिण्यानंतर आपण घराबाहेर पडल्याचे दिसले. उद्धवजी आपण वाघ, वाघनखे, कोथळा, चिलखत अशा अनेकानेक विषयांवर यथेच्छ शौर्यपूर्ण गप्पा खूप छान मारत असता. आणि आपल्या पक्षाचे असंख्य शूर सैनिक आपल्या पक्षाच्या विचारांचे गावागावातून प्रदर्शन नेहमीच करत असतात. त्याचाच भाग म्हणून मागील काही दिवसांपासून म्हणजेच आपण मुख्यमंत्री या पदावर विराजमान झाल्यापासून तुमच्या लोकशाहीवादी पुरोगामी सरकारमधील सैनिक शिक्षण क्षेत्रावर आणि पर्यायाने महाराष्ट्रातील विद्यापीठांवर जे हल्ले करताहेत ते खरंच तुमच्या संस्कृतीला शोभनीयच आहेत, यात तिळमात्र शंका नाहीये. बाकी बेश्ट सीएम साहेब तुम्ही एकदा ‘शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद – Live’ या कार्यक्रमा मध्ये म्हणाला होता की, “माझा विद्यार्थी माझी जबाबदारी” परंतु प्रत्यक्ष मात्र विद्यार्थी घडविणाऱ्या संस्कार पीठाच्या संहितेची म्हणजेच विद्यापीठ कायद्याची हत्या करून तुमचे सरकार आपला स्वार्थ साधण्यासाठी शिक्षण क्षेत्राला नियंत्रीत करून राजकीय अड्डा बनवू पाहत आहे. असे अभाविपचे प्रदेश सहमंत्री नागसेन पुंडगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.

नागसेन पुडगे म्हणाले ,सध्या विविध परीक्षांच्या पेपर फुटीची मालिकाच महाराष्ट्र सरकारने संपूर्ण देशासमोर उभी केली आहे. MPSC करणारे विद्यार्थी आत्महत्या करताहेत, म्हाडा पद भरती परीक्षेच्या आदल्या दिवशी आपल्या सरकारातील मंत्री जितेंद्र आव्हाड मध्यरात्री आॅनलाईन येऊन दलालांचे हित जोपासण्यासाठी परीक्षाच रद्द करतात हे अंत्यत चिंताजनक आणि भयावह आहे. अगदी गल्ली-बोळातील मंडळे देखील त्यांच्या सामान्य ज्ञान परीक्षा ह्या पारदर्शक पद्धतीने पार पाडताहेत परंतु आपले सरकार एकही पद भरती परीक्षा व्यवस्थित रित्या पूर्ण करू शकलेले नाहीये. या विविध प्रकारच्या पद भरती परीक्षां संबंधित अधिकारी हे रंगेहाथ पकडले जात आहेत, लाखोंचा आर्थिक गैरव्यवहार होत आहे, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आपले सरकार निर्लज्जपणे वारंवार दुर्दैवी खेळ मांडत आहे. परंतु हे सर्व राजरोस पणे होत असताना देखील तुमच्या सारखा संवेदशील, सोज्वळ, वर्ल्ड बेश्ट सीएम (मुख्यमंत्री) मौन धारण करून धृतराष्ट्रासारखा बघत आहे हे अनाकलनीय आहे, किमान त्या धृतराष्ट्राचा संजय त्याला वास्तव तरी दाखवायचा परंतु तुमचा संजय तुम्हांला काय दाखवितो याची सामान्यांना कल्पना नाही, म्हणूनच या पत्राच्या माध्यमातून मी तुम्हांला महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्राला वाचवण्यासाठी आवाहन करतो आणि ज्याप्रमाणे ‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ अगदी त्याचप्रमाणे ‘माझे विद्यापीठ माझी जबाबदारी’ समजून तुम्ही विद्यापीठांना राजकीय गुंडगिरीपासून वाचवाल या आशेनेच हा पत्र प्रपंच इथेच थांबवतो! असो. काळजी घ्या.. असे लीहेल्या प्रसिद्धीपत्रकात अभाविपचे प्रदेश सहमंत्री नागसेन पुंडगे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading