विचारधारांच्या झेंड्या पेक्षा सत्याचा शोध महत्वाचा – प्रा. मिलिंद जोशी
पुणे: विचारधारांचे झेंडे हातात घेऊन त्याच्या समर्थनार्थ लेखन केल्याशिवाय आपले अस्तित्व टिकणे कठीण आहे असे लेखक, कवी आणि विचारवंतांना वाटू लागले आहे हा त्यांच्या प्रतिभेचा आणि स्वत्वाचा पराभव आहे, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि प्रसिद्ध लेखक प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
रंगत-संगत प्रतिष्ठान तर्फे काव्यसंग्रह किंवा कवितेच्या प्रांतात काम करणा-या व्यक्तीला प्रतिवर्षी दिला जाणारा काव्य प्रतिभा पुरस्कार यंदा डाॅ.दिलीप देशपांडे आणि त्यांच्या त्रिरंग या काव्य ग्रंथास प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते प्रदान केला गेला त्यावेळी जोशी बोलत होते.
पत्रकार भवनच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड.प्रमोद आडकर, मैथिली आडकर उपस्थित होते.
संगणक तज्ज्ञ व लेखक डाॅ. दीपक शिकारपूर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष राजीव बर्वे हे देखील उपस्थित होते.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, विचारधारांच्या झेंड्यापेक्षा सत्याचा शोध महत्वाचा आहे. एखादी कविता व्यवस्थेवर भाष्य करते म्हणून ती श्रेष्ठ ठरत नाही आणि ती प्रेमकविता आहे म्हणून ती गौण ही ठरत नाही. ती कविता कोणता जीवनाशय मांडते यावरच त्या कवितेचे मोल ठरते. काव्य लेखनासाठी प्रतिभा, स्फूर्ती यांच्या इतकीच साधना महत्वाची आहे. कवीचे अनुभवविश्व जेवढे समृध्द तेवढी कविता कसदार होते.लेखक आणि कवींनी आपल्या लेखनातून सत्याचा शोध घेणे अपेक्षित आहे. सत्य हिरव्या, पिवळ्या,निळ्या, लाल,भगव्या किंवा केशरी रंगाचे नसते. सत्य डाव्या किंवा उजव्या बाजूचे नसते.
डाॅ. दीपक शिकारपूर यांनी ही यावेळी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. तर डाॅ.दिलीप देशपांडे यांनी त्रिरंग या काव्य ग्रंथ निर्मीती मागचा प्रवास उलगडला.
शिल्पा देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. अॅड.प्रमोद आडकर यांनी प्रास्तिविक केले तर मैथिली आडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
