fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsNATIONALPUNE

आर्मी गुडविल स्कूलच्या उभारणीसाठी लष्कर व इंद्राणी बालन फाउंडेशन यांच्यामध्ये दूसरा सामंजस्य करार

श्रीनगर : आर्मी गुडविल स्कूलच्या पाच शाळांच्या निर्मितीसाठी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (दि. २५) भारतीय लष्कर व इंद्राणी बालन फाऊंडेशनमध्ये दूसरा सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार आर्मी गुडविल स्कूलच्या पायाभूत सोयीसुविधा उभारण्यासाठी पुढील पाच वर्ष इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी ३ कोटी २८ लाख रुपये इतकी मदत लष्कराला केली जाणार आहे. या कराराअंतर्गत कुपवाडा, शोपियान आणि कुलगाम जिल्ह्यातील बरौब, दावर, बालापूर आणि बेहिबाग येथे अतिरिक्त चार आर्मी गुडविल स्कूल (AGS) आणि दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम भागात आर्मी गुडविल पब्लिक स्कूल (AGPS) उभारण्यात येणार आहे.

काश्मीर खोऱ्यात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी भारतीय लष्कर व इंद्राणी बालन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आर्मी गुडविल स्कूल उभारण्यात आले आहेत. त्यानंतर स्वाक्षरी करण्यात आलेला हा इंद्राणी बालन फाउंडेशन सोबत चिनार कॉर्प्समधील दुसरा सामंजस्य करार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनरल ऑफिसर कमांडिंग (GoC) चिनार कॉर्प्स लेफ्टनंट जनरल डी.पी. पांडे यांच्यासह इंद्राणी बालन फाऊंडेशनचे पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल उपस्थित होते.

यावेळी बोलताना लेफ्टनंट जनरल डी.पी. पांडे म्हणाले की, इंद्राणी बालन फाउंडेशनच्यावतीने देशभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. पुनित बालन यांच्या नेतृत्वाखालील फाऊंडेशनला शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातील सामाजिक कार्याचा मोठा अनुभव आहे, जो भविष्यात या शाळांच्या शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी फायदेशीर ठरेल. गेल्या वर्षी चिनार कॉर्प्सने बारामुल्ला आणि कुपवाडा जिल्ह्यांतील उरी, वेन, त्रेहगाम आणि हाजिनारच्या पाच आर्मी गुडविल स्कूल (AGS)साठी इंद्राणी बालन फाऊंडेशन सोबत पहिला सामंजस्य करार केला होता. याशिवाय, फाउंडेशनने बारामुल्ला येथील विशेष दिव्यांग मुलांसाठी परिवार स्कूल सोसायटीसाठी नवीन पायाभूत सुविधा तयार केल्या. या वर्षी चार आर्मी गुडविल स्कूल्स (AGS) आणि आर्मी गुडविल पब्लिक स्कूल (AGPS)च्या उभारणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. 

पुढे बोलताना लेफ्टनंट जनरल डी.पी. पांडे म्हणाले, इंद्राणी बालन फाऊंडेशनचा हा उपक्रम इतर कॉर्पोरेट्ससाठी पुढे येण्यासाठी आणि समृद्ध काश्मीरच्या उभारणीत योगदान देण्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे. प्रगतीशील काश्मीरच्या पुनर्निर्माणासाठी बालन यांची ही सामाजिक जबाबदारी आणि दूरदृष्टी निश्चितच कौतुकास पात्र आहे.

इंद्राणी बालन फाउंडेशनचे पुनीत बालन म्हणाले की, दरवर्षी काश्मीर खोऱ्यातील पाच शाळांना आर्थिक सहाय्य करण्याचा आमचा मानस आहे. गेल्या वर्षी आमच्याकडे बहुतेक शाळा या उत्तर काश्मीर मधून होत्या, परंतु या वर्षी तीन शाळा या दक्षिण काश्मीरमधून आहेत. चांगल्या राष्ट्र निर्मितीसाठी आम्ही सदैव सेवा करत राहू, असेही पुनीत बालन म्हणाले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading