निसर्गाच्या माध्यमातून ईश्वर करतो मनुष्याचे पालन व रक्षण –
कीर्तनकार ह.भ.प.वासुदेवबुवा बुरसे

पुणे :संपूर्ण विश्वातील चराचरावर, कणाकणावर, भूतमात्रावर फक्त आणि फक्त ईश्वराचीच सत्ता आहे. झाडाचे पानही त्याच्याच सत्तेने हलते. मनुष्य हा देखील निसर्गाचाच घटक आहे. त्याच्या देहाच्या सर्व क्रिया या ईश्वराच्या दयेची परिसिमा आहे. ईश्वर हा निसर्गाच्या माध्यमातून आपले पालन-पोषण आणि रक्षण करतो, असे मत कीर्तनकार ह.भ.प. वासुदेवबुवा बुरसे यांनी व्यक्त केले.

श्रीरामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग राम मंदिरात एकादशीनिमित्त विशेष कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.

वासुदेवबुवा बुरसे म्हणाले, मनुष्य देहात अनंत रहस्ये अजूनही दडलेली आहेत. विज्ञानाला देखील ती उलगडता आली नाहीत. धर्म आणि नीतीने आचरण करणारा मनुष्य, प्राण जाण्याची वेळ आली तरीदेखील अधर्म किंवा अनीतीचा आश्रय घेणार नाही. याच सद््गुणामुळे तो गोंधळात सापडतो आणि प्रसंगी संकटही ओढावून घेताना आढळतो.

ते पुढे म्हणाले, भगवंताला निष्काम कर्म प्रिय असते. ईश्वरार्पण भावाने केलेले कर्म भगवंतापर्यंत नक्की पोहोचते. भगवंत एवढा दयाळू आहे की, तो त्याबद्दल आपल्याला शतपटीने नव्हे, तर सहस्त्रपटीने देतो. आपण जसे कर्म करतो, तसेच फळ आपल्याला मिळते. त्यामुळे भगवंतांचे स्मरण करीत आपण सत्कार्य करीत रहायला हवे, असेही त्यांनी सांगितले. कीर्तनाला श्रीरंग चासकर यांनी तबला तर साहिल पुंडलिक यांनी पेटीची साथसंगत केली.

Leave a Reply

%d bloggers like this: