अखेर परवानगी नाटयानंतर उद्या होणार नामांतर शहीद स्मारकाचे भूमिपूजन

औरंगाबाद : विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव तत्कालीन मराठवाडा विद्यापीठास देण्यात यावे यासाठी 17 वर्ष संघर्ष करावा लागला. या अस्मितेच्या स्वाभीमानाच्या लढ्यात शहिद झालेल्या नामांतर शहीदांचे भव्य स्मारक करण्यात यावे, या मागणीनुसार आज बहुप्रतिक्षित नामांतर शहीद स्मारकाचे उद्या सकाळी 7 वाजता कुलगुरूंच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.

काही दिवसांपासून विद्यापीठ गेट लगतच्या मोकळ्या जागेवर स्वच्छता करण्यात येत असल्याने यंदा भूमिपूजन होणार ही चर्चा होती. मात्र स्मारक समिती व प्रशासनातील समन्वयाच्या अभावातून पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या परवानगीसाठी काही तांत्रिक बाबीमुळे उद्या भूमिपूजन होणार नसल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले होते.  त्याची माहिती देण्याकरिता आज संध्याकाळी 4 वाजता महात्मा फुले सभागृहात कुलगुरू डॉ.येवले व पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार व स्मारक समितीचे सदस्य सिनेट,अधिसभा सदस्य विविध विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांत जोरदार खडाजंगी झाली व कुठल्याही स्थितीत उद्या भूमिपूजन झाले पाहिजे ही एकमुखी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली.

पोलीस निरीक्षक पोतदार ह्यांनी तंत्रिक बाबी समजावून सांगितल्या परंतु आपल्या परिसरात होणाऱ्या अंतर्गत कार्यक्रमास पोलिसांच्या परवानगीची गरज काय? स्मारक समितीने आता पर्यंत काय केले? नाहरकत प्रमाणपत्र का मिळवले नाही? आदी प्रश्नांचा कार्यकर्त्यांनी प्रशासनावर भडिमार केला व समितीच्या सदस्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले. ह्यावेळी मंचावर कुलगुरू येवले,पोलीस निरीक्षक पोतदार,डॉ.वाल्मिक सरवदे,डॉ.प्रतिभा अहिरे,डॉ.चेतना सोनकांबळे,सुनील मगरे,विजय सुबुकडे,फुलचंद सलामपूरे हे उपस्थित होते तर डॉ.शंकर अंभोरे,अरुण शिरसाठ,नागराज गायकवाड, सचिन निकम, कुणाल खरात,प्रकाश इंगळे,सचिन बोर्डे,अमोल दांडगे,गुणरत्न सोनवणे,अतुल कंबळे,दीक्षा पवार,सचिन शिंदे,राहुल तायडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

शेवटी कुलगुरूंनी व्यक्तिशः ह्या बाबत तात्काळ पाठपुरावा करून 2 तासात भूमीपूजनाबाबत भूमिका स्पष्ट करावी अन्यथा उद्या आम्ही प्रतिकात्मक भूमिपूजन करू असा इशारा देण्यात आला.
थोड्या वेळाने माजी नगरसेवक मिलिंद दाभाडे, गौतम लांडगे, किशोर थोरात, गौतम खरात यांनी  कुलगुरूंना जाब विचारत उद्या उदघाटन झालेच पाहिजे असा आग्रह धरला.

त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर कुलगुरु, स्मारक समिती सदस्य,व अधिसभा सदस्य असे एकूण 5 लोक भूमिपूजन करणार असल्याचे कुलगुरूंनी जाहीर केले.

Leave a Reply

%d bloggers like this: