एकपात्री कलाकार परिषद, निळू फुले कला अकादमीतर्फे महिलांसाठी सौ. श्यामल कुलकर्णी स्मृती एकपात्री अभिनय स्पर्धा
पुणे : एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्र आणि निळू फुले कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने सौ. श्यामल कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ केवळ महिलांसाठी राज्यस्तरीय श्यामल करंडक एकपात्री अभिनय स्पर्धेचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे पहिले वर्ष असून स्पर्धेची प्राथमिक फेरी 12 व 13 फेब्रुवारी रोजी तर अंतिम फेरी 20 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे.
स्पर्धेत 18 वर्षे वयावरील महिलांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेतील अंतिम विजेत्या महिलेस पाच हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक व श्यामल करंडक देण्यात येणार असून द्वितीय क्रमांकास तीन हजार रुपये व स्मृतीचिन्ह, तृतीय क्रमांकास दोन हजार रुपये व स्मृतिचिन्ह तर उत्तेजनार्थ दोन पारितोषिके देण्यात येणार आहेत, अशी माहिती एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्रचे अध्यक्ष दीपक रेगे, श्यामल कुलकर्णी यांच्या कन्या अनुजा कोल्हटकर, स्पर्धा संयोजक पल्लवी परब-भालेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. एकपात्री कलाकार परिषदेचे मकरंद टिल्लू, दिलीप हल्याळ, चैताली माजगावकर-भंडारी, अनुपमा कुलकर्णी तर निळू फुले कला अकादमीचे विश्वस्त सुरेश देशमुख उपस्थित होते.
