PDCC निवडणूक : दगाफटका होण्याची भीती खरी ठरली – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत दगाफटका होईल. याची भीती मला वाटत होती. ती आज खरी ठरली आहे. मला एका जागेबाबत शंका होतीच. काही ठिकाणी मतं विभागली गेली. अनेक ठिकाणी आमचे कार्यकर्ते कमी पडले, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केले.

पुणे जिल्हा बँक मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा आज निकाल लागला. यामध्ये 21 पैकी 20 जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. तर एक जागा भाजपच्या प्रदीप कंद यांनी पटकावली. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार बोलत होते. आज अजित पवार पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कारभाराचा आढावा घेण्याकरता आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
अजित पवार म्हणाले, आमची जागा एका ठिकाणी आली नाही. आमचे कार्यकर्ते येथे कमी पडले. मात्र, अनेक ठिकाणी मताधिक्य जास्त आहे. अनेक ठिकाणी आम्ही त्याचा विचार करु. जिल्हा बँक आली, त्यात एक जागा गेली आमचे 13 ठिकाणीं मतदान होतं. त्यात 8 ठिकाणी मागे राहिलो. बाकी सर्वच जागा चांगल्या मतांनी आल्या आहेत. निवडून आलेल्या सर्वांचे अभिनंदन, असे अजित पवार म्हणाले.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले किंवा इतर मंत्री काय म्हटले हे सांगायला मी मोकळा नाही
ओबीसी आरक्षणाविषयी जितेंद्र आव्हाड यांनी आज एक मोठे वक्तव्य केले आहे. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारले असता अजित पवार म्हणाले, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्र पुरता राहिलेला नाही, त्यामुळे कोणीही राजकारण करू नये. जितेंद्र आव्हाड काय म्हणाले किंवा इतर मंत्री काय म्हटले हे सांगायला मी मोकळा नाही, माझी मत मी स्पष्ट मांडत असतो.
