पुढील आठवड्यात महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशही गारठणार
पुणे : तामिळनाडू आणि आसपासच्या भागात अवकाळी पाऊस असला तरी देशाच्या उर्वरीत भागात थंडीचे प्रमाण वाढले आहे. पुढील आठवड्यात महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशही गारठणार असून येथे तापमानात विशेष घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविका आहे. दरम्यान, सध्या पडत असलेल्या थंडीचा फायदा रब्बी पिके व लागवड केलेल्या कांद्याना होणार आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात केवळ महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश राज्यात किमान तापमानात विशेष घट होऊन तेथेही चांगलीच थंडी जाणवेल. त्याच बरोबर संपूर्ण उत्तर भारतात पाऊस, बर्फवृष्टी तर काही ठिकाणी गारपीट व दाट धुके तर सकाळच्यावेळी खालावलेली दृश्यता, असे वातावरणीय बदलामुळे महाराष्ट्रात चांगलीच थंडी जाणवू शकते.
देशाच्या वायव्य तसेच उत्तरेतील अनेक भागात थंडीचा कहर दिसून येत आहे.
दरम्यान, शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या पालम भागात तापमान 4 अंशाच्या आसपास होते. सफदरजंग भागातही तापमान 10 अंश होते. हीच स्थिती उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाबमध्ये होती. काश्मीर, हिमाचल प्रदेंश आणि उत्तराखंडात तर सध्या बर्फवृष्टी आहे. एकूणच महाराष्ट्रातील थंडी सुसह्य असून ही थंडी गुलाबी अशीच म्हणावी लागेल. राज्यात इतरत्र गुलाबी थंडी जाणवत असली तरी मुंबईत मात्र किरकोळ थंडी जाणवत आहे.
