जम्मूतील माता वैष्णोदेवी मंदिरात दुर्घटना; चेंगराचेंगरीत 13 जणांचा मृत्यू
जम्मू : नवीन वर्षांच्या पहिल्या दिवशीच जम्मू येथील माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी होवून 13 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या घटनेत 14 जण जखमी असून त्यातील 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. आज (1 जानेवारी) पहाटे पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, नवीन वर्षांची सुरूवात वैष्णोदेवीच्या दर्शनाने करण्यासाठी असंख्य भाविकांनी जम्मूतील माता वैष्णोदेवी मंदिरात गर्दी केली होती. रात्रीच्या वेळी देखील हे मंदीर भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले होते. अशातच आज (1 जानेवारी) पहाटे पावणे तीनच्या सुमारास गेट नं. 3 च्या जवळ भाविकांमध्ये बाचाबाची झाली व नंतर या बाचाबाचीचे रूपांतर भांडण व चेंगराचेंगरीत झाले. भाविक इतक्या मोठ्या संख्येने होते की या चेंगराचेंगरीत 13 जणांचा मृत्यू झाला. तर 14 जण जखमी असून त्यांना नारायणा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यातील 3 जणांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दुखः व्यक्त केले असून त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखा रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. तर उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. तसेच घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करणार असल्याचेही जाहीर केले आहे.
