तब्बल चार वर्षांनंतर उद्या (1 जानेवारी ) रंगणार बैलगाडा शर्यत
पुणे : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी दिल्यानंतर तब्बल चार वर्षांनंतर उद्या (1 जानेवारी) बैलगाडा शर्यत रंगणार आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे ही पहिली बैलगाडा शर्यत पार पडणार आहे. त्यामुळे या बैलगाडा शर्यतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.
2017 नंतर होत असलेली ही बैलगाडा शर्यत आंबेगाव येथील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी आयोजित केली आहे. या बैलगाडा शर्यतीमध्ये राज्यभरातून जवळपास 701 बैलगाडा मालक सहभागी होत आहेत. या शरीतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून कोरोना नियमांचे पालन करून ही शर्यत पार पाडली जाणार आहे. याबरोबरच लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेले बैलगाडा प्रेमींना या शर्यतीत सहभागी होता येणार आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी मिळाल्यानंतर एकदा खेड येथे बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. मात्र बघ्यांची प्रचंड गर्दी व कोरोना नियम न पाळल्याने पोलिसांनी ही शर्यत बंद पाडली होती. त्यामुळे उद्याची बैलगाडा शर्यत पार पडते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फोटो – संग्रही
