MPSC विरोधात असभ्य वक्तव्य केल्यास परीक्षेस बसू दिले जाणार नाही
मुंबई : एमपीएससी (MPSC) आयोगाच्या कार्यप्रणाली विरोधात असभ्य, असंस्कृत आणि असंसदीय व वक्तव्य करणाऱ्या उमेदवारांच्या विरोधात कारवाईचा बडगा आयोगाकडून उगारण्यात आला आहे. अशा उमेदवारांना काही कालावधीसाठी किंवा कायमस्वरूपी परीक्षेला बसण्यास मज्जाव करण्यात येईल, असा इशारा आयोगाकडून देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून MPSCच्या गलथान कारभारा विषयी विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. त्यातूनच समाज माध्यमांवर टीका केली जात आहे. तसेच प्रसार माध्यमांमध्येही MPSC विषयी अयोग्य भाषा वापरली जात आहे. या पार्श्वभूमीवर MPSC आयोगाकडून आज एक परिपत्रक काढून संबंधीत विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी MPSCच्या ढिसाळ व संथ कारभारामुळे परीक्षेत पास होवून देखील स्वप्नील नावाच्या एका विद्यार्थ्याने पुण्यात आत्महत्या केली होती. राज्यात सर्वत्र या घटनेचे पडसाद उमटले. मात्र तरी देखील MPSC तर्फे नुकतेच जाहीर करण्यात आलेल्या मुलाखातीच्या यादीत त्याचे नाव दिसून आले. एमपीएससी संविधानात्मक संस्था असून देखील राज्य सरकारप्रमाणे यांचाही कार्यभार ढिसाळ आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये MPSCच्या कार्यप्रणाली विषयी प्रचंड रोष आहे. युपीएससीच्या धर्तीवर MPSCचा ही कारभार सुधारावा, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
