Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी उपचाराची सुविधा उपलब्ध व्हावी; अन्यथा शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये मागील एक वर्षापासून नगरसेवक, पालिकेचे कर्मचारी येणारे नागरिक यांच्याबाबत अशा काही घटना घडल्या आहेत की त्यांना आरोग्य विषयक कोणत्याही तातडीच्या सुविधा पुरवू शकलो नाही. हे निश्चितच संतापजनक आहे. महानगरपालिकेमध्ये रोज हजारो नागरिक, लोकप्रतिनिधी येत असतात. हजारोंच्या संख्येने या ठिकाणी कर्मचारी काम करीत आहेत. त्यांना जर आरोग्याशी निगडीत कोणतीही आपत्कालीन मदत लागली तर अशी या ठिकाणी व्यवस्था नाही. त्यामुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या उपचाराची सोय व्हावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार व विशाल धनवडे म्हणाले की, या ठिकाणी कोणतीही उपचारांची सोय नाही. तसेच येथे स्ट्रेचरची व्यवस्था नसल्यामुळे सदरच्या व्यक्तीला झोळीमध्ये घेऊन जावे लागते. अॅम्ब्युलन्स नसल्यामुळे कोणाच्यातरी गाडीची वाट पहावी लागते आणि डॉक्टर कायमस्वरूपी नसल्यामुळे त्यांना डॉक्टर शोधण्यास धावाधाव करावी लागते. यामुळे सदरच्या रुग्णाच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. तरी आमची शिवसेना पक्षाच्या वतीने मागणी आहे की आपण त्वरीत एक महिला डॉक्टर व पुरुष डॉक्टर यांची नेमणूक करावी. त्याचबरोबर एक अॅम्ब्युलन्स पालिकेच्या आवारात तैनात करावी व एक बेसिक उपचारासाठी OPD ची व्यवस्था करावी. या मागणीची त्वरीत अंमलबजावणी करावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पुणे महानगरपालिकेतील शिवसेनेच्या वतीने दिला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading