Sunday, November 1, 2026
Latest NewsPUNE

पुणे महानगरपालिकेत विविध पदासाठी होणार मेगाभरती

पुणे : गेल्या सहा वर्षापासून पुणे महापालिकेत पदभरती झालेली नसल्याने बहुतांश कारभार हा कंत्राटी कामगारांच्या भरवशावर सुरू आहे, तर अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने एकाकडे अनेक जबाबदाऱ्या आहेत. अशी स्थिती असताना आता राज्य सरकारने महापालिकेला पदभरती करण्याची परवानगी दिली असून, प्रत्येक विभागाने त्यांच्याकडील रिक्त जागांची माहिती संवर्गनिहाय सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच पुणे महानगरपालिकेत विविध पदासाठी मेगाभरती होणार आहे. महापालिकेत अंदाजे ११ हजार पदे रिक्त आहेत.

पुणे महापालिकेत हद्दीलगतची गावे समाविष्ट झाल्याने राज्यातील सर्वात मोठी महापालिका अशी ओळख निर्माण झाली आहे. एकीकडे हद्दवाढ, लोकसंख्या वाढ होत असताना दुसरीकडे प्रशासनामध्ये काम करण्यासाठी कायमस्वरूपी कर्मचारी नाहीत, सेवक, उप अभियंता नाहीत अशी अवस्था आहे. त्यामुळे जे कर्मचारी आहेत, त्यांनाच एकाच वेळी अनेक विभागांचा कारभार पहावा लागत आहे. तसेच अतिक्रमण विभागात तर फक्त सात पदे भरलेली आहेत, त्यामुळे विभागाला क्षेत्रीय कार्यालयावर अवलंबून राहावे लागत आहे. मिळकतकर विभागातील पदे रिक्त असल्याने इतर विभागातील तब्बल १५० कर्मचाऱ्यांची या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक, बिगारी, चालक, डॉक्टर, नर्स, टेक्निशियन यासह इतर पदे रिक्त असल्याने सध्या कंत्राटी कामगारांकडून ही कामे करून घेतली जात आहेत.

वेतनावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने २ जून २०१५ पासून पदभरतीवर निर्बंध लादले. त्यामुळे महापालिकेतील विभिन्न विभागातील भरती प्रक्रिया रखडली होती. सरकारने भरती सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला. त्याला आता मान्यता देण्यात आली आहे.

Leave a Reply