अपंगांना कर सलवत देण्यासाठी पाठपुरावा प्रधान सचिवाकडे करणार- महापौर मुरलीधर मोहोळ
पुणे – अपंगांना मिळकतकरात ५० टक्के सवलत दिली जावी यासाठी महापालिकेच्या मुख्यसभेने ठराव करून शासनाकडे मान्यतेसाठी पाठवला आहे.
त्यास त्वरित मान्यता मिळावा यासाठी प्रधान सचिवांकडे पत्र पाठवून पाठपुरावा केला आहे. यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
शहरातील अपंग नागरिकांच्या प्रश्नांवर मुरलीधर मोहोळ यांनी बैठक घेतील. यावेळी १४ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गुरुवारी (ता. २३) अपंग संघटनांतर्फे महापालिकेची मुख्यसभा सुरू असताना आंदोलन केले होते. त्याची दखल घेऊन ही बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत अपंग संघटनांच्या प्रतिनिधींनी मिळकतकरात ५० टक्के सवलत, पथारी नोंदणीसाठी बायोमॅट्रीक नोंदणीचा विषय उपस्थित केला. तसेच अतिक्रमण कारवाई करताना अपंग नागरिकांशी व्यवस्थित वर्तणूक केले जात नाही, नुकसान केले जाते अशी तक्रार काहीजणांनी केली. त्यावर अपंग नागरिकांचा स्टॉल असेल तर महापालिकेच्या पथकाने योग्य पद्धतीने कारवाई करावी, त्यांच्याबद्दल सहानुभूतिपूर्वक विचार करावा अशा सूचना प्रशासनाला महापौरांनी दिल्या.
अपंग नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेत नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याबद्दल तक्रारी असल्याने दुसरा अधिकारी नियुक्त केला जाईल. तसेच प्रत्येक क्षेत्रिक कार्यालयाच्या ठिकाणी अपंग नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी एक अधिकारी असेल. त्यांच्या योजनांच्या निधीची माहिती उपलब्ध होईल याची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले .
