BIG NEWS – मुंबईत बुधवारी अडीच हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण
मुंबई : राज्यात मागील काही दिवासांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत बुधवारी २ हजार ५१० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील मागील काही महिन्यात कोरोना रुग्णांची वाढलेली ही सर्वात मोठी संख्या आहे. मंगळवारी रुग्ण संख्या १ हजार ३७७ होती. तर आज मुंबईत गेल्या २४ तासांपासून २५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच मुंबईत आज केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला असला तरी वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. एकट्या मुंबईत राज्यातील ८० टक्के रुग्ण आढळले आहेत.
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली. मुंबईत मंगळवारी नोंदवण्यात आलेल्या १ हजार ३७७ रुग्णसंख्येने मुंबई प्रशानसाला जाग आली. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत ७० टक्क्यांनी वाढ झाली होती. या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी मुंबईला अलर्ट जारी केला आहे. मुंबईत बुधवारपासून २ हजार रुग्ण आढळतील अशी शक्यता त्यांनी वर्तवली होती. आदित्य ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे मुंबईत आज अडीच हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबईत सध्या ८ हजार६० अँक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत आज दिवसभरात ५१ हजार ८४३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील २ हजार ५१० कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतील सध्या १ सक्रीय कंटेनमेंट झोन आहे. मुंबईतील सक्रीय सीलबंद इमारतींची संख्या ४५ आहे.
