वास्तववादी बाबा साकारतोय – अरुण नलावडे
मन उडू उडू झालं ही मालिका आणि त्यातील व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. या मालिकेतील दिपू-इंद्र ही प्रमुख जोडी तर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतेच आहे पण त्याचसोबत मालिकेतील काही व्यक्तिरेखांचा अभिनय हा हृदयस्पर्शी आहे. दिपूचे बाबा म्हणजेच देशपांडे सर यांची भूमिका मनाला भिडते. अरुण नलावडे यांनी साकारलेला बाबा हा प्रेक्षकांना आपल्यातील एक वाटतो.
त्यांच्या या हृदयस्पर्शी भूमिकेबद्दल बोलताना अरुण नलावडे म्हणाले, “खऱ्या आयुष्यात मलाही मुलगीच आहे. त्यामुळे मुलीचे वडील या आनंदाचा आणि जबाबदारीचा मला अनुभव आहे. मुलगा मुलगी असा भेद न करणाऱ्या देशपांडे सरांची भूमिका मी मन उडू उडू झालं या मालिकेत साकारतोय. संस्कार करताना कठोर, तर मुलींसाठी हळवा असा वास्तववादी बाबा मी यात साकारतोय. सगळं गोड गोड किंवा फक्त नकारात्मक असं न दाखवता परिस्थितीनुसार वेगवेगळ्या भावनांतून व्यक्त होणारे बाबा असल्यामुळे प्रेक्षकांना ते आपल्यातलेच एक वाटतात.”
