बाणेर कोविड सेंटरमध्ये जेवणात झुरळ; पालिकेने ठेकेदाराचे कंत्राट काढले
पुणे : बाणेर येथील कोविड सेंटरमध्ये जेवणात झुरळ निघाल्याची तक्रार रुग्णांनी केली आहे.
मात्र, ‘हे झुरळ नसून, गरम मसाला आहे’ असा युक्तीवाद संबंधित अन्न पुरवठादार कंपनीच्या ठेकेदाराने केला आहे. पुणे महापालिकेने या तक्रारीची दखल घेवून संबंधीत ठेकेदाराकडून कंत्राट काढून घेतले आहे.
नक्की प्रकार काय आहे?
रविवारी सकाळी आणि सायंकाळच्या जेवणात झुरळ निघाल्याची तक्रार अक्षय इंगळे आणि सागर घोडेस्वार या रुग्णांनी केली आहे. तसेच जेवणही निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार रुग्णांनी केली. याठिकाणी सध्या 15-16 रुग्ण उपचार घेत आहेत. जेवणाची गुणवत्तातर खराब आहेच, असे इंगळे यांनी सांगितले. याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, येथील जेवण निकृष्ट असल्याचे आढळून आले.
दरम्यान, जेवण पुरवण्याचे कंत्राट संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे आहे, त्याचा संबंध कोविड सेंटर प्रशासनाचा नाही. त्यामुळे याची तक्रार संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे वेळोवेळी करण्यात आली आहे. हे जेवण तेथील स्टाफ आणि डॉक्टरांनाही दिले जाते, असे तेथील एका डॉक्टरांनी सांगितले.
ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करणार
“याबाबत चौकशी केली असून, रविवारी हा प्रकार आढळून आला. या जेवणाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, संबंधित ठेकेदाराचे जेवण निकृष्ट असल्याने याआधी त्याला नोटीस दिल्या होत्या. आता या प्रकरणामुळे त्या ठेकेदाराची जेवण पुरवण्याचे कंत्राट काढून घेतले असून, त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.”
– डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा
कारवाई सुरू आहे
“जेवणात झुरळ निघाल्याची तक्रार एफडीएकडे मिळाली असून, त्याबाबत कारवाई सहायक आयुक्तांकडून सुरू आहे.”
– शिवाजी देसाई, सह आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन
