ट्रूस्पेस पुणे जिल्हा खुल्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत कशिश जैन, मृण्मयी बागवे, धनश्री खैरमोडे, अविरत चौहान, पुष्कराज साळुंखे यांना विजेतेपद
पुणे : पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल(पीडीसीसी)यांच्या वतीने आयोजित ट्रूस्पेस पुणे जिल्हा खुल्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत कशिश जैन, मृण्मयी बागवे, धनश्री खैरमोडे, अविरत चौहान, पुष्कराज साळुंखे, चतुर्थी परदेशी, निहिरा कौल, निहिरा कौल या खेळाडूंनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
मिलेनियम नॅशनल स्कुल, कर्वेनगर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत खुल्या गटात सातव्या फेरीअखेर फिडे मास्टर कशिश जैन याने गौरव बाकलीवालचा पराभव करून 6.5गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. कशिश हा 11वी इयत्तेत एसपी कॉलेज मध्ये शिकत आहे. 17 वर्षांखालील मुलांच्या गटात पाचव्या फेरीत पुष्कराज साळुंखे याने सिद्धांत सातोचा पराभव करून 4.5गुणांसह विजेतेपद पटकावले. याच मुलींच्या गटात धनश्री खैरमोडेने 5 गुणांसह विजेतेपद पटकावले. महिला गटात मृण्मयी बागवे हिने 5.5 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. 9 वर्षांखालील मुलांच्या गटात अविरत चौहानने, तर मुलींच्या गटात चतुर्थी परदेशी यांनी अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील 9, 13, 17 वर्षांखालील गटांतील अव्वल दोन खेळाडूंची तर, खुल्या पुरुष व महिला गटातील अव्वल चार खेळाडूंची निवड जानेवारी 2022 मध्ये होणाऱ्या रराज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ट्रुस्पेसचे व्यवस्थापकीय संचालक व पीडीसीसीचे उपाध्यक्ष आश्विन त्रिमल, पीएनजी ज्वेलर्सचे चेअरमन सौरभ गाडगीळ, महिला ग्रँडमास्टर ईशा करवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, मिलेनियम स्कुलचे मुख्याध्यापक अन्वित पाठक, पीडीसीसीचे सचिव डॉ. संजय करवडे, बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे, सीए रणजीत नातू, एमसीएचे अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे संचालक विपुल लुनावत, चीफ आरबीटर विनिता श्रोत्री, राजेंद्र शिदोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
