Friday, June 26, 2026
Latest NewsPUNE

धर्मव्यवस्था स्थिर करण्याकरीता घेतो भगवंत अवतार – कीर्तनकार ह.भ.प.रवींद्रबुवा चिखलीकर

पुणे :भगवंत अवताराचे महात्म्य श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम म्हणजे कीर्तन आहे. सज्जनांचे रक्षण व दुर्जनांचा नाश करण्याकरिता भगवंत पृथ्वीतलावर अवतरित होतात. ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते, चहूकडे अधर्म माजू लागतो, तेव्हा पुन्हा धर्मव्यवस्था स्थिर करण्याकरिता भगवंत अवतार घेतो, असे मत कीर्तनकार ह. भ. प. रवींद्रबुवा चिखलीकर यांनी व्यक्त केले.

श्रीरामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग राम मंदिरात दत्तजयंती उत्सवानिमित्त विशेष कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.

‘सत्व हरण्यासी पातले परी ते बाळाची झाले’, या पंक्तीचे विश्लेषण करताना रवींद्रबुवा चिखलीकर म्हणाले, एखादी व्यक्ती पुण्यवान होते तेव्हा देवांच्या मनात भय निर्माण होते. आपले स्थान त्या व्यक्तीने हिरावून घेतले तर काय होईल असा प्रश्न पडतो.

ते पुढे म्हणाले, त्या भीतीपोटी सकल देवता श्री विष्णूंना शरण जातात व त्यांना विनंती करतात की अनुसयेचे सत्व हरण करा. ते सत्व हरण करण्याकरिता ब्रह्मा-विष्णू-महेश अत्रि आश्रमात साधू वेश धारण करून जातात. पण तीच सत्व हरण्या ऐवजी ते तिघे तिचे बालक होतात. अनुसया व अत्री महामुनी यांची ही कथा त्यांनी यावेळी श्रोत्यांना सांगितली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading