Saturday, October 31, 2026
Latest NewsMAHARASHTRA

कुलपतींच्या अधिकारात हस्तक्षेपा विरुद्ध अभाविपच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आंदोलन

औरंगाबाद : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात बदल करून विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर घाला घालत राज्य मंत्रिमंडळाचा कुलपतींच्या अधिकारात हस्तक्षेपा विरुद्ध आज अभाविपच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जोरदार आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले. यामध्ये विद्यापीठाच्या स्वायतत्तेवर घाला घालत स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी विद्यापीठ कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय हे प्रस्तावित असून येत्या अधिवेशनात ह्या निर्णयाचे रूपांतर कायद्यात करण्याचा मानस राज्य शासनाचा आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व शासकीय विद्यापीठांचे कुलपती असणारे राज्यपाल हे देखील कुलगुरूंची थेट नियुक्ती करू शकणार नाही. यापुढे कुलगुरू निवड राज्यशासनाने सुचवलेल्या दोन नावांमधूनच राज्यपालांनी करावी लागेल.

राज्य शासन पूर्णपणे कुलपती अधिकारात हस्तक्षेप करीत आहे. विद्यापीठामध्ये कुलपती पदावर प्र. कुलपती म्हणून एक नवीन पद निर्माण करण्यात येणार असून त्या पदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यावरून विद्यापीठांच्या स्वायतत्तेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न राज्यशासन करीत आहे. यावरून स्पष्टपणे राजकीय पक्ष, नेते यांचा अवाजवी हस्तक्षेप निर्णय प्रक्रियेत वाढेल.

कुलपती (राज्यपाल) हे सर्व विद्यापीठांचे प्रमुख आहेत, त्यांच्या अधिकारांवर हे सर्वार्थाने आक्रमण आहे. या निर्णयाने सर्व गुणवत्ताधारक प्राध्यापक, विद्यार्थी यांच्यावर विपरीत परिणाम राजकीय दबावाने होऊ शकतो. विद्यार्थ्यांना प्रत्येक निर्णयामध्ये राज्य शासनाकडे बघावे लागेल. विद्यापीठांची गुणवत्ता पूर्णपणे ढासळण्याची शक्यता या निर्णयाने निर्माण होत आहे. विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे राजकीयकरण या निर्णयामुळे होईल असे मत प्रदेशमंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी मांडले.

तरी विद्यार्थी हिताचा विचार करून हा निर्णय तात्काळ रद्द करावा यासाठी कुलगुरूंच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे पत्र देऊन हा निर्णय रद्द करावा यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी राजकीय क्षेत्राचा हस्तक्षेप बंद करा, सरकारचे वसुलीकडे लक्ष विद्यापीठ केलं भक्ष, शिवसेना भवन काँग्रेस भवन राष्ट्रवादी भवन विद्यापीठाचे केले महाराष्ट्र सरकारने हवनं अशा घोषणा देत परिसर दणाणून काढला.

यावेळी महानगर मंत्री नागेश गलांडे, सहमंत्री स्नेहा पारीक, दीपक टोणपे, ऋषिकेश केकान, उमाकांत पांचाळ, सोबिया शेख, माधुरी कुलकर्णी, महेश भवर, श्यामसुंदर सोडगीर, भीमराव मोटे, प्रतीक्षा काळदाते, मयुर काथार, सतीश बडे, प्रभा जाधव, गायत्री राऊत, विवेक खामकर, सौरभ हरबक, अश्विनी वनारसे, ओम राठोड, करण चौधरी, अभिषेक गावडे, ओमकार देवरे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply