संगीत उपचार पद्धतीचा सखोल अभ्यास होणे गरजेचे – ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खान
पुणे : भारतीय शास्त्रीय संगीत जगभरात श्रेष्ठ आहे आणि संगीताचा परिणाम मानवी तनामनावर होतोच पण तो नेमका कसा आणि कोणत्या व्याधी वर कोणता राग गायला पाहिजे किंवा कोणती संगीत उपचार पद्धती वापरली पाहिजे याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खानयांनी व्यक्त केले.
सुर संजीवन ट्रस्टच्या वतीने संगीत उपचार आणि करिअरच्या संधी या विषयावर मोफत कार्यशाळेचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. यावेळी गायक राजेश दातार, पं.शशांक कट्टी, संगीता सांगवीकर ,डॉ शुभंकर कुलकर्णी, डॉ राजेंद्र दीक्षित, डॉ.स्नेहल सिंग,डॉ .दीपाली छाजेड उपस्थित होते.
पं.शशांक कट्टी म्हणाले ,’संगीत हे शास्त्र म्हणून स्वीकारले जावे, कारण शेकडो लोकांनी वेगवेगळे प्रयोग करून त्याचे परिणाम अभ्यासले आहेत, आरोग्य संगीत आणि उपचारक संगीत वेगळे आहेत असे सांगत जसे औषधाचे घटक असतात तसेच सूर हे या उपचाराचे घटक आहेत.आजवर अनेक व्याधींवर संगीताचा परिणाम दिसून येतो यात भौतिक शास्त्रीय आधार आहे. राजेश दातार म्हणाले, संगीताचे मानवी मनावर विविध परिणाम होतात. याबाबत अधिकाधिक संशोधन केले जाईल असा विश्वास व्यक्त केला. ऋषीराज शिंदे यांनी तबल्यावर साथ केली.
यावेळी श्रोत्यांच्या प्रश्नांचे पं.कट्टी यांनी निरसन केले. तसेच संगीत उपचार आणि करिअर संधी यावर मार्गदर्शन केले. यावेळी सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले
