मंदिराबद्दलची अनास्था दूर केली पाहिजे – डॉ. गो. बं. देगलूरकर
पुणे : धार्मिक पर्यटन म्हणून लाखो लोक मंदिरांना भेट देतात परंतु त्यामागे काय विज्ञान आहे ते जाणून घेत नाही. मंदिरांबद्दलची अनास्था इतकी वाढली आहे की,अनेक मंदिराच्या आजूबाजूला कचराकुंड्या तयार झाल्या आहेत. मंदिरे हे आपले वैभव आहेत ते आपणच जपले पाहिजे, यासाठी मंदिरांमागचे विज्ञान नवीन पिढीला समजून सांगितले पाहिजे, अशी भावना ज्येष्ठ मूर्ती शास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी व्यक्त केली.
कै. मोरेश्वर कुंटे आणि त्यांच्या पत्नी विजया कुंटे यांनी पाहिलेल्या 18 हजार मंदिरापैकी काही आगळ्यावेगळ्या मंदिरांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. गाणारे दगड आणि बोलणारे पाषाण या प्रदर्शनाचे उद्घाटन देगलूरकर आणि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रविंद्र देव यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कैलास सोनटक्के, प्रभाकर कुंटे, प्रियांका कुंटे, प्र. के. घाणेकर, जलतरंग वादक मिलिंद तुळाणकर आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मिलिंद तुळाणकर यांनी दगडांवर राष्ट्रगीत वाजवून दाखविले.
डॉ. गो. बं. देगलूरकर म्हणाले, मंदिरे पहायला जाणाऱ्या माणसांमध्ये अनेक गैरसमज आहेत, त्यातूनच मंदिराबद्दलची आणि एकूण आपल्या संस्कृतीबद्दलची अनास्था वाढीस लागली आहे. ही अनास्था दूर करायची असेल, तर नवीन पिढीपर्यंत अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून मंदिर उभारणी मागील विज्ञान पोहोचवले पाहिजे, त्यासाठी शाळाशाळांमधून प्रदर्शन भरविले पाहिजे , असेही त्यांनी सांगितले.
रविंद्र देव म्हणाले, मोरेश्वर कुंटे यांनी संपूर्ण आयुष्य मंदिरांचे विज्ञान आणि अध्यात्म यांचा प्रचार आणि प्रसार करण्यात घालवले. नवीन पिढीने त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. त्यांचे कार्य शाळांमध्ये प्रदर्शन भरवून लहान मुलांपर्यंत पोहोचविले, तर आपली नवीन पिढी मंदिराबाबत अधिक जागरूक होईल आणि आपला वारसा आणि संस्कृती रक्षण आणि संवर्धन करण्यास अधिक मदत होऊ शकेल.
दिनांक 20 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 यावेळेत घोले रस्त्यावरील राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
